Join us  

महागडे टेंडर कोकोनट आईस्क्रीम आता बनवा घरच्याघरी, शहाळ्याची गारेगार जादू - व्हा फ्रेश...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2023 3:32 PM

How To Make Tender Coconut Ice Cream At Home : Tender Coconut Ice Cream Recipe : शहाळ्याच्या पाण्याचा व मलईचा वापर करुन आपण थंडगार टेंडर कोकोनट आईस्क्रीम बनवण्याची सोपी कृती पाहूयात

उन्हाळा आणि थंडगार, गारेगार शहाळं यांचं एक प्रकारचं अतूट नातं आहे. उन्हामुळे जीवाची काहिली होते, या रणरणत्या उन्हांत स्वतःच्या शरीराला थंडावा मिळवून देण्यासाठी आपण बहुतेकदा उन्हाळ्यात शहाळ्याचं पाणी पितो. वाढत्या तापमानामुळे शरीराची लाही लाही होण्यापासून वाचण्यासाठी आपण शीतपेय, सरबत, फळांचे रस, शहाळ्याचं पाणी असे अनेक पदार्थ सतत घेत असतो. 

उन्हाळ्यात थंडगार आईस्क्रीम खाण्याची मजा काही वेगळीच असते. बहुतेक वेळा आपण उन्हाळ्यात आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम खाणे पसंत करतो. या दिवसांत आपण सिजनल फळांपासून तयार झालेले आईस्क्रीम खाण्याला जास्त प्राधान्य देतो. आंब्याचे आईस्क्रीम, कलिंगडाचे आईस्क्रीम, शहाळ्याचे आईस्क्रीम अशा अनेक आईस्क्रीमच्या फ्लेवर्सचा आनंद घेत आपण आईस्क्रीम खातो. रणरणत्या उन्हांमुळे आलेला शारीरिक थकवा दूर करण्याचे सर्वात मोठे काम शहाळाचे पाणी करते. शहाळ पिऊन झाल्यावर त्यातील मऊ, लुसलुशीत मलई खाणे म्हणजे स्वर्गसुखच. उन्हाळ्यांत शहाळाचे पाणी पिण्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण शहाळाचे पाणी तर आवर्जून पितोच. परंतु या शहाळाचे पाणी व मलई वापरुन आपण घरच्या घरी झटपट पार्लरसारखे टेंडर कोकोनट आईस्क्रीम तयार करु शकतो. तारला दलाल यांच्या इंस्टाग्राम पेजवरुन हे टेंडर कोकोनट आईस्क्रीम कसे बनवायचे त्याच्या रेसिपीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. शहाळ्याच्या पाण्याचा व मलईचा वापर करुन आपण थंडगार टेंडर कोकोनट आईस्क्रीम बनवण्याची सोपी कृती पाहूयात(How To Make Tender Coconut Ice Cream At Home : Tender Coconut Ice Cream Recipe).  

साहित्य :- 

१. शहाळ्याची मलई - ३/४ कप २. शहाळ्याचं पाणी - १/४ कप ३. नारळाचं दूध - १/२ कप ४. व्हिप क्रिम - १ कप ५. कंडेंन्स मिल्क - १/३ कप ६. व्हॅनिला इसेंन्स - १/४ टेबलस्पून ७. शहाळ्याची मलई - २ टेबलस्पून (बारीक कापून लहान तुकडे करुन घेतलेली)

कृती :- 

१. सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यात शहाळ्याची मलई काढून घ्यावी. २. आता यात शहाळ्याचं पाणी व नारळाचं दूध घालून हे सर्व जिन्नस एकत्रित करुन मिक्सरमध्ये ब्लेंड करुन घ्यावेत. ३. शहाळ्याची मलई, पाणी व नारळाचं दूध यांचं एकत्रित ब्लेंड केलेलं मिश्रण तयार करुन बाजूला ठेवावे. ४. एका मोठ्या बाऊलमध्ये व्हिप क्रिम घेऊन ही क्रिम ब्लेंडरच्या मदतीने मिनिटभर फेटून घ्यावी. 

लालचुटूक कलिंगडाचे गारेगार आइस्क्रिम, कल्पनाच किती भारी आहे! घ्या सोपी रेसिपी- करा उन्हाळा साजरा...

शहाळ्याचं पाणी आणि मलईचं गारेगार मिल्कशेक पिऊन तर पाहा, उन्हाळा आवडायला लागेल...

५. व्हिप क्रिम मिनिटभर फेटून घेतल्यानंतर त्यात कंडेंन्स मिल्क, व्हॅनिला इसेंन्स व  शहाळ्याची मलई, पाणी व नारळाचं दूध यांचं एकत्रित ब्लेंड केलेलं मिश्रण घालून सर्व जिन्नस एकजीव करुन घ्यावेत. ६. हे सर्व जिन्नस एकजीव झाल्यानंतर ब्लेंडरच्या मदतीने मिनिटभर फेटून घ्यावे. ७. सगळ्यात शेवटी या आईस्क्रीमच्या तयार मिश्रणांत शहाळ्याची बारीक कापून लहान तुकडे करुन घेतलेली मलई घालावी. ८. आता हे आईस्क्रीमचे तयार मिश्रण एका अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात काढून त्यावर प्लास्टिक पेपरने अलगद रॅप करुन हे आईस्क्रीम व्यवस्थित सेट होण्यासाठी ८ ते १० तासांसाठी रेफ्रिजरेट करुन घ्यावे.

शाही गुलकंद फिरनी, भर उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा पारंपरिक पदार्थ, बनवायला सोपा चवीला उत्तम...

घरच्या घरी आईस्क्रीम पार्लरसारखे टेंडर कोकोनट आईस्क्रीम खाण्यासाठी तयार आहे. आपल्या आवडीनुसार हे आईस्क्रीम सर्व्ह करताना त्यावर शहाळ्याच्या  मलईचे बारीक कापून लहान तुकडे करुन घेतलेले मलईचे तुकडे घालावेत.

टॅग्स :अन्नपाककृती