चहाच्या चाहत्यांची आपल्याकडे काही कमी नाही. जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलो तरीही आपल्याला अनेक चहाप्रेमी भेटतील. चहा प्रेमी चहाची तलफ भागवण्यासाठी काय करतील याचा नेम नसतो. अनेकांच्या दिवसाची सुरुवात वाफाळत्या चहाने होते. एक चहा दिवसभराचा थकवा दूर करतो, तर ताजंतवानं राहण्यासाठी चहा प्यायला जातो. काही जणांना दिवसातून कितीही वेळा आणि कोणत्याही वेळी चहा पिण्याची सवय असते. चहा हा हजारो वर्षांपासून मानवी जीवनाचा भाग बनला आहे. जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये चहाचे महत्त्वाचे स्थान आहे.
चहा हा भारतीयांच्या जीवनातला जिव्हळ्याचा विषय आहे. 'चाय पे चर्चा' करत करत आपण भारतीय जीवनातील बऱ्याच गोष्टीचे निर्णय घेतो. चहा हा संवादाचा सहज साधा-सोपा पर्याय असतो. चहा प्रेमींना वेगवेगळ्या प्रकारच्या चहाचा आस्वाद घेणे पसंत असते. आजकाल बाजारांत देखील चहाचे अनेक प्रकार आपल्याला सहज उपलब्ध होतात. गुळाचा चहा, तंदुरी चहा, कुल्लड चहा, शाही चहा, अशा असंख्य प्रकारच्या चहाच्या चवींनी चहा प्रेमींना भुरळ पाडली आहे. आपण रोज सकाळी उठून आपला नेहमीचा साधा चहा तर पितोच पण काहीवेळा काहीतरी वेगळं ट्राय करुन पाहण्याची इच्छा होतेच. अशावेळी आपण फक्कड बासुंदी चहाचा बेत आखू शकता. झटपट बासुंदी चहा बनवायला अतिशय सोपा व चवीला उत्तम लागतो. बासुंदी चहा एकदा नक्की ट्राय करुन पाहा(How To Make Thick & Creamy Basundi Chaha At Home).
साहित्य :-
१. दूध - ३ कप २. वेलची - १ टेबलस्पून ३. जायफळ - १/४ टेबलस्पून ४. सुंठ - २ टेबलस्पून ५. साखर - १/४ टेबलस्पून ६. चहापूड - २ टेबलस्पून ७. साखर - ३ ते ४ टेबलस्पून
कृती :-
१. सर्वप्रथम एका भांड्यात ३ कप दूध ओतून घ्यावे. आता हे दूध मंद आचेवर ठेवून चांगले गरम करुन घ्यावे. २. एका पॅनमध्ये वेलची(सालीसहित) व जायफळ पूड घेऊन हे दोन्ही जिन्नस कोरडे भाजून घ्यावे. ३. भाजून घेतल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात वेलची(सालीसहित) व जायफळ पूड काढून घ्यावी. त्यानंतर त्यात सुंठ व साखर घालावी आता हे सर्व जिन्नस मिक्सरला लावून बारीक पूड होईपर्यंत वाटून घ्यावे. ४. हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये वाटून घेतल्यानंतर, मिक्सरमध्ये तयार झालेला बासुंदी चहाचा मसाला काढून एका हवाबंद डब्यांत भरुन स्टोअर करुन ठेवावा.
खा खजूर पाक, दिवसभराचा प्रोटीन डोस! रेसिपी सोपी - मुलांसह पालकांची तब्येतही होईल तंदुरुस्त...
५. आता आपण गरम करुन ठेवलेले दूध परत एकदा गॅसवर ठेवून त्यात चहापूड व ३ ते ४ टेबलस्पून साखर आणि यासोबतच बासुंदी चहाचा तयार करुन घेतलेला मसाला १/२ टेबलस्पून घालावा. ६. ३ कप दुधापासून तयार केलेला चहा मंद आचेवर उकळवून २ कप होईपर्यंत आटवून घ्यावा. ७. त्यानंतर हा गरमागरम बासुंदी चहा गाळणीने व्यवस्थित गाळून घ्यावा.
आपला बासुंदी चहा पिण्यासाठी तयार आहे.