'आंबोळी' हा कोकणातील अतिशय लोकप्रिय पारंपरिक पदार्थ आहे. महाराष्ट्रातील कोकण भागांत हा पदार्थ बऱ्याचदा नाश्त्याला किंवा जेवणाला आवडीने खाल्ला जातो. कोकणातील हा मऊ, लुसलुशीत पारंपरिक पदार्थ आता सगळ्यांच्याच घरात मोठ्या आवडीने बनवून खाल्ला जातो. शक्यतो आंबोळी हा पदार्थ पिवळी बटाट्याची भाजी, खोबऱ्याची घट्ट चटणी किंवा काळ्या वाटाण्याच्या सांबार सोबत खाल्ला जातो. कोकणातील हा खास लोकप्रिय पदार्थ सकाळी नाश्त्याला खाणे म्हणजे याहून मोठे सुख नाही.
'आंबोळी' हा पदार्थ मऊ, लुसलुशीत, छान जाळीदार झाला तरच खायला मजा येते. 'आंबोळी' बनवण्यासाठी त्याचे इडली, डोश्याप्रमाणे पीठ तयार करून ते आंबवून घ्यावे लागते. 'आंबोळी' बनवण्यासाठी तांदूळ व डाळींचे योग्य प्रमाण घेऊन त्याचे पीठ तयार करावे लागते. हे पीठ तयार करताना योग्य त्या प्रमाणांत डाळ तांदूळ घेऊन पीठ तयार करावे लागते, जर का हे प्रमाण चुकले तर 'आंबोळी'चे पीठ व्यवस्थित फुलून येत नाही. त्यामुळे छान जाळीदार, मऊ, लुसलुशीत 'आंबोळी' बनत नाही. यासाठी 'आंबोळी' बनवताना त्यात डाळ, तांदुळाचे प्रमाण किती घ्यावे ? पीठ कसे भिजवावे ? आंबोळ्या कशा कराव्यात ? याचे साहित्य व कृती पाहूयात(How To Make Traditional Amboli At Home : Amboli Recipe).
साहित्य :-
१. तांदूळ - ३ कप २. पांढरी उडीद डाळ - १ कप ३. पोहे - १/२ कप ४. मेथी दाणे - १ टेबलस्पून ५. तेल - १ टेबलस्पून ६. मीठ - चवीनुसार
जाळीदार डोसे, लुसलुशीत इडली हवी? पाहा डाळ तांदूळ प्रमाण गणित, करा परफेक्ट साऊथ इंडियन पदार्थ...
कृती :-
१. ३ कप तांदुळ, १ कप उडीद डाळ आणि १ चमचा मेथी दाणे स्वच्छ धुवून ६ ते ८ तास वेगवेगळे भिजत ठेवावे. २. ६ ते ८ तासांनंतर त्यात अर्धा कप भिजवलेले पोहे घालून मिश्रण जाडसर, घट्ट वाटून घ्यावे. ( वाटताना प्रथम उडीद डाळ वाटून त्यानंतर पोहे, तांदुळ व मेथीदाणे घालून वाटून घ्यावे )३. वाटलेले मिश्रण एका हवाबंद डब्यात भरून उबदार ठिकाणी रात्रभर ठेवून द्यावे.(थंडीच्या दिवसात त्यात थोडे गरम पाणी घालावे, त्याने पीठ आंबण्यास मदत होते). ४. सकाळी डबा उघडून वर आलेले मिश्रण व्यवस्थित ढवळुन चवीप्रमाणे मीठ घालावे. (गरज वाटल्यास थोडे पाणी घालावे).
५. तवा चांगला गरम करून त्यावर थोडे तेल सोडून घ्यावे. ६. गरम तव्यावर चमचाभर पीठ घालून गोलाकार पसरवून घ्यावे. ७. झाकण ठेवून मध्यम आचेवर १ ते २ मिनिटे शिजवून घ्यावे. ८. २ मिनिटानंतर परतून दुसरी बाजू १ ते २ मिनिटे शिजवून घ्यावी.
डोसा करताना तुम्हीही हमखास करत असाल ५ चुका, शेफ संजीव कपूर सांगतात डोसा सिक्रेट...
आता आपली आंबोळी खाण्यासाठी तयार आहे. खोबऱ्याची चटणी, काळ्या वाटण्याची उसळ यासोबत गरमागरम आंबोळीचा आस्वाद घ्यावा.