श्रावणात अनेक घरांमध्ये मांसाहार टाळला जातो. अशावेळी काहीतरी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात वरण भाताबरोबर तुम्ही सुरणाचे काप, वांग्याचे काप अशा रेसिपीज ट्राय करू शकता. तोंडी लावणीसाठी हा उत्तम पर्याय आहे. (Vangyache Kap Recipe)
ही डिश बनवण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. १० ते १५ मिनिटांत बनून तयार होईल. मुलं भाजी खायला नाटकं करतात तेव्हा त्यांना डब्याला देण्यासाठी हा पदार्थ चांगला आहे. चपातीचा रोल बनवून तुम्ही त्यात वांग्याचे काप घालू शकता. (How to make vangyache kap)
साहित्य
वांगी- १ ते २
लाल तिखट- १ टिस्पून
हळद -१ टिस्पून
धणे पावडर - १/२ टिस्पून
मीठ - १ टिस्पून
आलं - १ इंच
लसूण - ४ ते ५
मिरच्या - २ ते ३
रवा- १ वाटी
कॉर्नफ्लोअर - पाव वाटी
बारीक चिरलेली कोथिंबीर- पाव वाटी
तेल - गरजेनुसार
कृती
१) वांग्याचे काप बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक मोठं वांग धुवून घ्या. त्यानंतर त्याचे पातळ काप करा. चिरून झाल्यानंतर हे काप पाण्यात ठेवा अन्यथा वांगी काळी पडतात.
२) एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, लसूण, आलं, मिरची, घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट एका ताटात ठेवून त्यात हळद, मीठ, लाल तिखट, धणे पूड, घालून एकत्र करा.
३) वांग्याच्या कापांना दोन्ही बाजूंनी हे मिश्रण लावा. त्यानंतर एका ताटात रवा, कॉर्नफ्लोर आणि लाल मसाला घालून मिश्रण तयार करा.
४) वांग्याचे काप रव्यात व्यवस्थित घोळवून पॅनमध्ये तळण्यासाठी ठेवा. एक बाजू चांगली फ्राय झाली की दुसऱ्या बाजूने हे वांग शिजवून घ्या. त्यावर चिरलेली कोथिंबीर घाला. तयार आहेत गरमागरम वांग्याचे काप.
५) ज्या दिवशी भाजी बनवण्याचा कंटाळा आला असेल किंवा तुम्ही साधा वरण भाताचा बेत केला असेल त्या दिवशी तुम्ही वांग्याचे काप बनवू शकता.