ड्रॅगन फ्रूट हे साधारणपणे थंड प्रदेशात मिळणारे फळ. पण गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडेही हे फळ सर्रास दिसायला लागले आहे. आरोग्यासाठी ड्रॅगन फ्रूट खाणे फायदेशीर असले तरी हे फळ सोलायचे किंवा चिरायचे कसे असा प्रश्न अनेकांना पडतो आणि त्यामुळेच हे फळ सहसा खाल्ले जात नाही. अननस ज्याप्रमाणे सोलायला अवघड असतो त्याचप्रमाणे हे फळ सोलायलाही थोडी ट्रीक वापरावी लागते. लो कॅलरी फ्रुट म्हणून हे फळ ओळखलं जातं. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणारे लोकही ड्रॅगन फ्रुट खाऊ शकतात. शिवाय पौष्टिकतेच्या बाबतीतही हे फळ उत्तम आहे. इतर फळांपेक्षा त्याचं स्वरुप आणि चव वेगळी असल्याने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच ते आवडीने खातातही. आज आपण ड्रॅगन फ्रूट सोलण्याची आणि चिरण्याची एक सोपी ट्रीक पाहणार आहोत. ज्यामुळे हे फळ खाणे सोपे होईल (How to Peel or Cut Dragon Fruit Properly).
स्टेप्स
१. सुरुवातीला या फळाच्या पुढचा आणि मागचा भाग सुरीने कापून घ्यायचा.
२. आता फळाला उभे धरा आणि मध्यभागी उभा काप द्यायचा.
३. काप दिल्यानंतर फळाचे साल आणि फळ दोन्हीही चिरले जाईल.
४. त्यानंतर हे साल सहज निघून येण्यास मदत होईल. हे साल हाताने सहज फळापासून वेगळे होईल. मग फळाच्या आपल्याला हव्या तशा फोडी करता येतील.
ड्रॅगन फ्रुट खाण्याचे फायदे
१. ड्रॅगन फ्रुटमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे त्वचेसाठी ते पोषक ठरते.
२. या फळामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने खाल्लेले अन्न पचण्यासाठी हे फळ चांगले असते.
३. या फळात कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने वेटलॉस करणाऱ्यांसाठीही उपयुक्त.
४. ॲण्टीऑक्सिडंट्स, प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्सही या फळामध्ये भरपूर असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर.