पिवळं धम्मक मक्याचे कणीस छान भाजून त्यावर मीठ, मसाला भुरभुरवून खाणे सगळ्यांनाच पसंत असते. प्रामुख्याने पावसाळा व हिवाळ्यात वातावरणात प्रचंड गारवा असतो. अशा वातावरणात गरमागरम पदार्थ खाण्याची मजा काही औरच असते. मका भाजून त्याचा भुट्टा केला जातो, मक्याचं गरमागरम सूप बनवलं जात. त्याचप्रमाणे थंडीत मक्के दी रोटी आणि सरसों दा साग खाण्याची मजा काही वेगळीच असते. मक्याची रोटी खास हिवाळ्यातच केली जाते. कारण मक्याचे पदार्थ फक्त चवीलाच नाहीतर आरोग्यासाठीही उत्तम असतात. मक्याचे दाणे सुकवून त्याचे पीठ काढले जाते. ज्याला आपण कॉर्नफ्लोर असे म्हणतो. हे कॉर्नफ्लोर पदार्थांची रूची तर वाढवतेच शिवाय ते आपल्या आरोग्यासाठीही उत्तम असते.
आपण कित्येकदा बाजारांतून मका विकत आणतो. मका विकत घेताना तो बाहेरुन तर चांगला दिसतो परंतु आतून काहीवेळा खराब असण्याची शक्यता असू शकते. अशावेळी हे आतून खराब झालेले मके फेकून देण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो. यासाठीच मके खरेदी करत असताना काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपण चांगल्या दर्जाचे व जास्त दिवस टिकणारे मके सहज खरेदी करु शकतो(How To Pick Out The Best Sweet Corn To Buy).
बाजारांतून मक्याचे कणीस विकत घेताना नक्की कोणती खबरदारी घ्यावी?
१. मक्याच्या कणसावरील साल तपासून पहा :- जर आपल्याला बाजारांतून फ्रेश आणि चांगल्या दर्जाचा मका खरेदी करायचा असल्यास सर्वप्रथम त्याच्यावरील साल तपासून पहावी. जो मका ताजा, फ्रेश व उत्तम दर्जाचा असेल त्याची साल आतून व बाहेरून दोन्ही बाजुंनी हिरवीगार असेल. असा हिरवीगार साल असलेलाच मका खरेदी करावा. मक्याच्या बाहेरच्या सालीचा रंग हा जर पिवळा असेल तर असे मके खरेदी करणे टाळावे कारण ते आतून खराब असण्याची शक्यता असू शकते. पिवळ्या रंगांच्या साली असलेले मके सहसा आतून खराब असतात तसेच ते फ्रेश देखील नसतात. त्याचप्रमाणे हे मके जर खूप दिवस असेच ठेवले तर त्याची साल ही गोल्डन ब्राऊन रंगाची होते, गोल्डन ब्राऊन साल असलेले मके आतून खराब असण्याची शक्यता असते.
२. मक्याचे धागे तपासून पहा :- मक्याच्या कणसाला सुरुवातीच्या टोकाला काही मऊ धागे असतात. हे धागे मऊ आणि हिरव्या रंगांचे असतात. मक्याचे धागे जर गडद ब्राऊन रंगांचे असतील तर असे मके खरेदी करु नका. मक्याचे हे लहान - लहान धागे थोडेसे ओले व चिपचिपीत असतात. यांचा वास घेतल्यास त्यांना एक प्रकारचा गोड सुगंध येतो. असे मके आतून खूप चांगले असतात व ते जास्त दिवस टिकतात. यासाठीच मका खरेदी करत असताना मक्याचे धागे तपासून पहा.
३. मक्याचे दाणे बोटांनी दाबून पहा :- मक्याचे दाणे बोटांनी हलकेच दाबून पहाणे हा उत्तम दर्जाचा मका निवडण्यासाठीचा एक सर्वोत्तम उपाय आहे. मक्याचे दाणे बोटांनी दाबून पाहिल्यानंतर त्यातून दुधासारखा एक पातळ पांढरा द्रव पदार्थ बाहेर पडतो. आपण मका विकत घेत असताना त्यांचे दाणे बोटांनी दाबून पाहिल्यानंतर त्यातून असा दुधासारखा द्रव पदार्थ बाहेर पडला तर मका ताजा व चांगला आहे असे समजावे.
कांदे विकत घेताना कसे ओळखायचे की कांदे उत्तम प्रतीचे आहेत की खराब आहेत? तपासा...
४. मक्याच्या देठाचा रंग :- मका खरेदी करत असताना त्याच्या देठाचा रंग तपासूनच मग मका विकत घ्यावा. जर मका फ्रेश असेल तर त्याच्या देठाचा रंग हा हिरवा असतो. शक्यतो हिरवे देठ असलेलाच मका विकत घ्यावा. जर मक्याचे देठ ब्राऊन किंवा काळ्या रंगाचे असेल तर असा मका खरेदी करु नये. ब्राऊन किंवा काळ्या रंगाचे देठ असलेला मका फ्रेश नसून तो जास्त काळ टिकत नाही व लगेच खराब होतो.
५. मक्यांवरील काळे डाग :- फ्रेश आणि टेस्टी मका विकत घेण्यासाठी त्याच्या वरील डाग सर्वप्रथम तपासून पहावे. मका विकत घेण्याआधी त्याच्यावरील साल काढून मका आतून कसा आहे ते एकदा तपासून घ्यावे. साल काढल्यानंतर मक्याच्या दाण्यांवर जर काळे डाग असतील, किंवा मक्याचे दाणे आतून सडलेले असतील तर असा मका विकत घेऊ नये. काहीवेळा मका बाहेरून दिसताना खूप चांगला दिसतो परंतु आतून तो खराब निघतो. यासाठीच मका विकत घेताना त्याची बाहेरील साल काढून आतील मक्याचे दाणे व्यवस्थीत आहेत याची एकदा खात्री करुन घ्यावी.