एप्रिल महिना उजाडला की आपल्या सगळ्यांनाच वेध लागतात ते आंब्याचे. मग आंब्याच्या फोडी असो किंवा आमरस. मँगो मिल्क शेक असो किंवा आणखी काही आपण त्यावर अक्षरश: ताव मारतो. वर्षातून एकदाच दोन महिन्यांकरता येणारा हा आंबा किती खाऊ आणि किती नको असे होऊन जाते. यावर्षी नेहमीपेक्षा आंबा उशीरा आला, त्यात पावसाची चिन्हेही लवकर सुरू झाल्याने आंबा लवकर पिकतो आणि एकदम इतका खाणे शक्य नसते. पाऊस सुरू झाल्यावर आंब्यामध्ये अळ्या किंवा इतर किड लागण्याची शक्यता असल्याने पावसाळा सुरू झाला की आंबा खाऊ नये म्हणतात. अशावेळी आंबा पुढचे काही महिने खाता यावा यासाठी काही सोप्या ट्रिक्स नक्की करता येऊ शकतात. जेणेकरुन आंब्याचा सिझन संपला तरी आपण आंब्याचा आस्वाद घेऊ शकतो. आता हे काय आणि कसे करायचे याविषयी समजून घेऊया...
१. आंब्याची जेली
हापूस किंवा तोतापूरी आंब्याची जेली पोळी, पुरी किंवा अगदी ब्रेडवर लावूनही खूप मस्त लागते. या आंब्याच्या बारीक फोडी करुन घ्यायच्या. कढईत तूप घालून त्यात दालचिनीचे दोन बारीक तुकडे घालायचे. त्यामध्ये साखर आणि पाणी घालून एकतारी पाक करुन घ्यायचा. पाक होत आला की त्यामध्ये या फोडी घालून सगळे काही वेळ एकजीव करुन शिजवून घ्यायचे. नंतर यामध्ये वेलची पूड घालायची. आवडत असतील तर बदाम आणि काजूचे तुकडे घातले तरी चालते. गार झाल्यावर ही जेली काचेच्या बरणीत भरुन फ्रिजमध्ये ठेवायची. अचानक कोणी पाहुणे येणार असतील तर गोड वाढायला. लहान मुलांना पोळीशी किंवा ब्रेडशी खायला किंवा आपल्यालाही कधी गोड खायची इच्छा झाली तर पटकन ही जेली घेता येते.
२. आंबा पोळी
साधारणपणे विकत आणला जाणारा हा पदार्थ आपण घरच्या घरीही अगदी सहज करु शकतो. यासाठी आंब्याचा रस काढून घ्यायचा. या रसामध्ये गाठी राहू नयेत म्हणून तो मिक्सरमधून बारीक करुन घ्यायचा. मोठ्या थाळ्यांमध्ये हा रस एकसारखा पसरु घ्यायचा आणि या थाळ्या उन्हामध्ये ठेवायच्या. संध्याकाळी एका बाजुने वाळल्यावर सुरीने हळूवर या पोळ्या काढून उलट्या करुन ठेवायच्या. या पोळ्या पूर्णपणे वाळवून झाल्यानंतर एका डब्यात त्या भरुन ठेवायच्या. या पोळ्या ८ ते १० दिवस बाहेर टिकू शकतात. पण त्यापेक्षा जास्त काळ हव्या असतील तर फ्रिजमध्ये ठेवलेल्या चांगल्या. जाता येता आंब्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर हा उत्तम पर्याय ठरतो.
३. आंब्याचा पल्प
अनेकदा आंब्याचा सिझन नसेल आणि आपल्याला आंब्याच्या फ्लेवरचे काही करायचे असेल तर आपण बाहेरुन आंब्याचा पल्प विकत आणतो. पण हा पल्प खूप महाग पडतो. तसेच तो टिकावा यासाठी त्यात काही प्रिझर्व्हेटीव्हज घातलेले असतात. मात्र आपण घरच्या घरी पिकलेल्या आंब्याचा रस काढून तो मिक्सरमधून बारीक करुन एका बरणीत किंवा बाटलीत भरुन फ्रिजमध्ये ठेवल्यास तो किमान ४ ते सहा महिने टिकू शकतो. हा रस जास्त टिकावा यासाठी यामध्ये साखर आणि थोडसं मीठ घातल्यास त्याचा नक्कीच चांगला उपयोग होतो. भविष्यात हा रस आपल्याला मिल्क शेक, आईस्क्रीम, केक, शिरा हे करताना सहज वापरता येतो.