Join us  

भेंडीची भाजी चिकट होते-तार येते? करा फक्त २ गोष्टी, भाजी होईल मस्त-मोकळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2024 3:06 PM

How to prevent bhindi sabji stickiness Cooking tips : भेंडीची भाजी कोणत्याही प्रकारे केली तरी ती मोकळी झाली तर खायला छान वाटते.

भेंडी ही बऱ्याच जणांची आवडीची भाजी, लहान मुलांना तर बहुतांश वेळा कोणती भाजी आवडते विचारलं की ते भेंडी असेच सांगतात. जवळपास वर्षभर सहज मिळणारी ही भाजी करायलाही सोपी असल्याने भाजीपाला आणताना आवर्जून आणली जाते. भेंडीची भाजी करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. कोणी कांदा-लसूण घालून, कोणी नुसती मिरची-जिऱ्यावर फ्राय करुन तर कोणी भरुन भेंडी करतात. दाण्याचा कूट, गोडा मसाला घालून केलेली भेंडीची भाजीही चविष्ट होते (How to prevent bhindi sabji stickiness Cooking tips). 

भेंडीची भाजी कोणत्याही प्रकारे केली तरी ती मोकळी झाली तर खायला छान वाटते. भेंडीला तार आली किंवा ती खूप चिकट झाली तर भाजी नको वाटते. भेंडी आरोग्यासाठी चांगली असल्याने त्याचा आहारात जरुर समावेश करावा असेही म्हटले जाते. भेंडीमध्ये मुळातच चिकटपणा असतो. त्यात आपण भाजी स्वच्छ होण्यासाठी ती धुतो आणि ती नीट कोरडी झाली नाही तर चिरताना त्याला तार येते. पाहूया भेंडीची भाजी मोकळी व्हावी आणि तार सुटू नये म्हणून काय करावे. भाग्यश्री करंदीकर याविषयी महत्त्वाच्या टिप्स देतात...

(Image : Google)

१. भाजी करताना आपण सगळ्यात आधी फोडणी करतो त्याप्रमाणे फोडणी करायची. त्यात आवडीप्रमाणे लसूण, कांदा घालायचा. भेंडी घातल्यानंतर त्यावर थोडी आमचूर पावडर घालायची. आमचूर पावडर आंबट असल्याने भेंडीचा चिकटपणा कमी होण्यास मदत होते. बरेच जण भेंडीच्या भाजीत लिंबू पिळतात. तर काही जण आमसूलही घालतात. आंबटपणामुळे भेंडीचा चिकटपणा कमी होतो. त्यानंतर मीठ, आवडीप्रमाणे दाण्याचा कूट घालायचा आणि भाजी एकसारखी हलवून घ्यायची. 

२. आपण साधारणपणे भाजी शिजण्यासाठी कढईवर झाकण ठेवतो. झाकण ठेवल्याने वाफेमुळे भाजी चांगली शिजते. पण भेंडीच्या भाजीवर झाकण ठेवले तर वाफेचे पाणी पडते आणि भेंडी जास्त चिकट होते. त्यामुळे भेंडीची भाजी शिजताना त्यावर झाकण न ठेवता ती नुसतीच शिजवावी आणि डावाने परतत राहावे. ५ ते १० मिनीटांत भाजी चांगली शिजते. भेंडी चांगली कोवळी असेल तर ती शिजायला जास्त वेळ लागत नाही. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.