दही हा आपल्याला रोजच्या जेवणातला आवर्जून खाल्ला जाणारा पदार्थ आहे. जेवताना पानांत दही, ताक वाढून घेतल्याशिवाय आपले जेवणच पूर्ण होत नाही. पांढरे, मलईदार, किंचित आंबट दही हे पूर्वीच्या काळापासून आपल्या जुन्या पिढ्यांच्या आहाराचा मुख्य भाग आहे. आजही लोक जेवणासोबत किंवा जेवणानंतर पचनशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दही खातात. दही शरीराला थंड ठेवण्यासाठी मदत करते. घरगुती आणि नैसर्गिकरित्या तयार केलेल दही हे स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. दही हे चांगले बॅक्टेरिया असलेले नैसर्गिक प्रोबायोटिक आहे.
दही आपल्याकडे अनेक प्रकारे वापरले जाते. दही-भात, दही-साखर, दही रायता आणि बरेच लोक दह्याचे ताक बनवून त्यापासून छान दाटसर कढी बनवून देखील खातात. नैसर्गिकरित्या उकळलेल्या दुधाला आंबट बनवलेल्या दह्यात अनेक प्रकारचे चांगले शरीरासाठी आवश्यक बॅक्टेरिया असतात. हल्ली बाजारात वेगवेगळ्या फ्लेवर्सचे दही उपलब्ध होतात. पण घरी बनविनेल्या दह्याची चव वेगळीच असते. असे असले तरीही घरी बनविलेल्या दह्याबाबत अनेकांची तक्रार असते की, दही पातळ होतं किंवा आंबट होतं. याच संदर्भात काही महत्वाच्या पण सोप्या टिप्स जाणून घेऊ. ज्यामुळे घरच्या घरी दही बनवताना जर ते आंबट झालेच तर फेकून न देता त्याचा आंबटपणा कसा दूर करता येईल यासाठी एका सोप्या ट्रिकचा वापर करु(How To Prevent Curd From Getting Sour, The Secrets To Making The Perfect Homemade Dahi).
दही आंबट झालेच तर त्याचा आंबटपणा कसा दूर करावा ?
उन्हाळ्यात बऱ्याचदा दही लावताना ते चवीने आंबट होते. काहीवेळा आपण दही बनवून काही दिवस तसेच ठेवले तरीही ते आंबट होऊ लागते. कधी चुकून दही लावताना आपल्या हातून विरजण जास्त लावले गेले तरीही दही आंबट होते. अशा परिस्थितीत ते दही फेकून न देता त्याचा आंबटपणा एक सहज सोपी ट्रिक वापरून लगेच दूर करु शकतो. दही बनून तयार झाले आहे त्याच भांड्यात थोडेसे गार पाणी व सोबतच बर्फाचे ४ ते ५ तुकडे घालावेत. आता या भांड्यावर झाकण ठेवून हे भांड फ्रिजमध्ये एक तासासाठी ठेवून द्यावे. १ तास झाल्यानंतर हे दह्याचे भांड फ्रिजमधून बाहेर काढून त्या दह्यावर साचलेले पाणी चमच्याच्या मदतीने काढून घ्यावे. त्यानंतर हे दही वापरण्यासाठी तयार आहे. ही सोपी ट्रिक वापरुन तुम्ही दह्यातील आंबटपणा सहज दूर करु शकता.
ताज्या हिरव्यागार मिरच्या लवकर पिकून लाल होतात? ५ सोप्या टिप्स, फ्रिजमध्ये १५ दिवस राहतील हिरव्या...
उन्हाळ्यात बाटलीतील पाणी जास्त वेळ थंड ठेवण्यासाठी १ सोपी ट्रिक... पाणी राहील गारेगार...
घरच्या घरी दही लावताना या ३ सोप्या ट्रिक्स फॉलो करा...
१. दही बनविण्यासाठी दूध चांगले उकळवा :-
दही बनविण्यासाठी दूध फक्त गरम करून घेणे गरजेचे नसते तर ते तर मोठया आचेवर चांगले उकळवून घेणे महत्वाचे असते. त्यानंतर हे दूध २० मिनिटे मंद आचेवर ठेऊन आटवून घ्या. मंद आचेवर दूध उकळून घेतल्याने त्यातही ओलावा कमी होतो आणि दूध किंचित घट्ट होते. त्याने दही गोड बनते.
२. जुन्या दह्याचा योग्य प्रमाणात वापर करा :-
बऱ्याच गृहिणी घरात असलेले जुने दही, ताक किंवा लोण्यापासून नवीन दही बनवतात. दही सेट करण्यासाठी जुने दही किती प्रमाणत घ्यावे याची कल्पना असणे आवश्यक आहे. जुने दही दुधात योग्य त्या प्रमाणानुसार मिसळा.
३. दही सेट करण्यासाठी किती वेळ ठेवावे :-
काही जण खूप जास्त वेळ दूध सेट करण्यासाठी ठेवतात. गरजेपेक्षा जास्त वेळ दूध सेट झालं तर दही आंबट होऊ शकते. म्ह्णून दही सेट होण्यासाठी ७ तासांचाच वेळ जाऊ द्यावा. त्याचबरोबर दह्यात असलेले अधिकचे पाणी सुती कापडाने गाळून घेतल्यास दही सहज घट्ट होईल.