उन्हाळा संपून पावसाळी हवा पडली की आपल्याला छान वाटते. अंगाची लाहीलाही कमी होऊन हवेत एकप्रकारचा गारवा निर्माण होतो. असे असले तरी पावसाळी हवा विषाणूंच्या वाढीसाठी चांगली असते. तसेच या हवेत असलेला दमटपणा आणि ओलावा किराणा सामानासाठी तितका चांगला नसतो. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात हवा कोरडी असल्याने किराण्याचे पदार्थ खराब व्हायची शक्यता तुलनेने कमी असते. पण पावसाळ्याच्या दिवसांत मात्र किराण्याचे पदार्थ बंद डब्यात जास्त काळ राहील्यास त्यांना बुरा लागण्याची शक्यता असते. (How To Protect Grocery From Fungus) पदार्थांना पुरेशी मोकळी हवा न लागल्याने अशाप्रकारची समस्या उद्भवते. एकदा पदार्थाला बुरा लागला की तो पदार्थ खाणे आरोग्यासाठी घातक असते. पण बुरा लागूच नये यासाठी कोणते उपाय करता येतील ते पाहूया...
१. भाजून ठेवणे
पदार्थ गरम करुन ठेवले की त्यामध्ये आर्द्रता राहण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे रवा, दाणे, पोहे, शेवई यांसारखे कोरडे पदार्थ बाजारातून आणले की ते कढईमध्ये घालून चांगले गरम करावेत किंवा भाजावेत. त्यानंतर गार झाल्यावरच हे पदार्थ डब्यात भरावेत. त्यामुळे पदार्थ जास्त कोरडे होतात आणि पावसाळ्यात दमट हवेतही खराब होत नाहीत.
२. सामानाला ऊन किंवा हवा देणे
पावसाळा असला तरी काही वेळा कडक ऊन पडते. असे ऊन पडले की आठवणीने धान्य, पीठे आणि इतर सामान असलेले डबे उन्हात उघडे करुन ठेवावेत. ऊन लागल्याने पदार्थांतील दमटपणा किंवा ओलसरपणा निघून जातो आणि पदार्थांना भुरा लागत नाही. यामुळे किराणा सामान टिकण्यास मदत होते. जास्त दिवस ऊन पडलेच नाही तर काय करावे असा प्रश्न असेल तर ठराविक दिवसांनी डबे उघडून ठेवावेत. यामुळे पदार्थांना हवा लागते आणि ते खराब होण्यापासून वाचतात.
३. जास्त सामान भरु नये
पावसाळ्याच्या दिवसांत हवा कुबट असल्याने २ ते ३ महिने आपल्याला लागेल तेवढेच सामान भरावे. अनेकांकडे वर्षाचे किंवा सहा महिन्याचे सामान भरायची पद्धत असते. एरवी ते ठिक असले तरी पावसाळ्याच्या काळात असे करु नये. सामान खराब झाले तर कष्टाने पिकवलेले सामान तर वाया जातेच पण आपले पैसेही वाया जातात. म्हणून जास्तीच्या सामानाची साठवणूक करुन ठेवू नये. आवश्यक तितके सामान वेळेत संपवले तर ते खराब होण्याची शक्यता राहत नाही. लागेल तसे सामान किराणा दुकानातून आणावे किंवा हल्ली ऑनलाइनही खरेदीचाही पर्याय सहज उपलब्ध आहे.
४. फ्रिजमध्ये ठेवावेत
भाजणी, बेसन पीठ, कुळीथ पीठ, तांदळाचे पीठ अशी पिठे आपल्याला रोज लागतातच असे नाही. आपण अनेकदा आठवड्यातून एकदा किंवा काही वेळा तर कित्येक दिवसांनी पीठांचे डबे उघडतो. मात्र जास्त दिवस पीठाला हवा लागली नाही तर त्याला बुरा किंवा जाळी-आळी लागण्याची लागण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. पीठ भाजून ठेवणेही शक्य नसल्याने ते खराब होऊ नये यासाठी पीठे पावसाळ्याचे २ ते ३ महिने फ्रिजमध्ये ठेवावीत.