बाजारांत खरेदीला गेले असताना छान, फ्रेश भाज्या दिसल्या की आपण लगेच खरेदी करतो. अशा भाज्या आपण घरी आणून व्यवस्थित स्वच्छ करून फ्रिजमध्ये ठेवतो. परंतु कधी कधी या भाज्या स्वच्छ करताना काही मोजक्या भाज्यांमध्येच आपल्याला किड किंवा छोट्या अळ्या दिसतात. या किडी तशाच राहिल्या तर भाज्या खराब होऊ शकतात. परंतु या किडींना किंवा अळ्या काढणे म्हणजे सोपे काम नाही. मुख्यत्वे करून कोबी, फ्लॉवर, पालक यांसारख्या भाज्यांमध्ये जास्त किडी सापडतात. पालक, मेथी यांसारख्या पालेभाज्यांवरील किड डोळ्यांना दिसतात. परंतु कोबी, फ्लॉवर यांसारख्या गड्डा असलेल्या भाज्यांमधील किड दिसत नाही. अशावेळी या भाज्यांमध्ये लपलेली किड कशी काढून टाकावी हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतोच. यासाठी भाज्यांमध्ये लपून राहिलेली किड काढून टाकण्यासाठी काही सोप्या टीप्स लक्षात ठेवू(How To Remove Bugs From Vegetables).
नक्की काय काय करता येऊ शकत?
१. व्हिनेगर आणि पाणी :- एका भांड्यात भाज्या संपूर्ण भिजतील इतके पाणी घ्या त्यात एक टेबलस्पून व्हिनेगर घालून घ्या. या मिश्रणात सगळ्या भाज्या कमीत कमी २० मिनिटे बुडवून ठेवा. त्यानंतर या भाज्या बाहेर काढून नळाच्या स्वच्छ वाहत्या पाण्याखाली धरून हातांनी व्यवस्थित धुवून घ्या.
२. चिंचेचे पाणी :- भाज्यांची योग्य ती वाढ होण्यासाठी त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची खत आणि औषधांची फवारणी केली जाते. या औषधांमधील हानीकारक घटक आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. म्हणून भाज्यांचा खाण्यासाठी वापर करण्याआधी त्यांना स्वच्छ धुवून घेणे गरजेचे आहे. एका भांड्यात एक ते दोन लिटर पाणी घेऊन त्यात एक कप चिंचेचे पाणी मिसळावे. या द्रावणात भाज्या काही वेळासाठी ठेवून द्या. थोड्या वेळाने या भाज्या काढून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
३. तुरटीचे पाणी :- तुरटीचा वापर करून आपण भाज्यांवरील कीटकनाशके, रासायनिक औषधे, आणि किडींना लगेच काढू शकतो. एका भांड्यात एक ते दोन लिटर पाणी घेऊन त्यात एक तुरटीचे खडे टाकावेत. तुरटीचे खडे पाण्यात संपूर्ण विरघळवून घ्यावेत. या तयार झालेल्या द्रावणात भाज्यांना ५ ते ७ मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर या भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात.
१. फ्लॉवर मधील किड कशी काढावी? फ्लॉवरला ४ भागांत कापून घ्या. त्यानंतर एका मोठ्या कढईमध्ये पाणी थोडे गरम करून घ्या. आता पाणी गरम झाल्यानंतर त्यात एक टेबलस्पून हळद घालावी. गॅस बंद करून घ्यावा. ही हळद संपूर्ण पाण्यांत मिक्स करून घ्यावी. आता फ्लॉवरचे चार तुकडे यात संपूर्ण भिजतील इतके पाण्यात बुडवून काही काळासाठी ठेवा. थोड्या वेळानंतर हे फ्लॉवरचे तुकडे पाण्यातून काढून स्वच्छ पाण्यांत धुवून घ्यावेत. यामुळे फ्लॉवर मधील किड मरतात आणि त्या काढणे सोपे होते.
२. ब्रोकोली मधील किड कशी काढावी? ब्रोकोलीचे छोटे - छोटे तुकडे करून घ्यावेत. मग एका मोठ्या भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात २ टेबलस्पून मीठ घालावे. मीठ संपूर्णपणे विरघळवून घ्यावे. आता ब्रोकोलीचे छोटे तुकडे या पाण्यांत घालावेत. अर्धा तास हे तुकडे या मिठाच्या पाण्यांत असेच ठेवून घ्या. अर्ध्या तासांनंतर ब्रोकोलीचे तुकडे स्वच्छ पाण्यांत धुवून घ्यावेत.
३. कोबी मधील किड कशी काढावी? कोबीमध्ये पानांचे थर हे एकमेकांना चिकटून असतात. त्यामुळे या पानांच्या आत लपून बसलेल्या किडींना किंवा अळ्यांना काढणे फार कठीण काम असते. सर्वप्रथम कोबीच्या बाहेरच्या बाजूने असणाऱ्या पानांचे दोन थर अलगद हाताने काढून ते फेकून द्यावेत. त्यानंतर कोबीच्या पानांना एक एक करून सुटे करून घ्यावेत. आता एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात एक टेबलस्पून बेकिंग सोडा घालावा. या द्रावणात कोबीची सुटी करून घेतलेली पान काही काळासाठी भिजवून ठेवावीत. थोड्या वेळाने ही पान बाहेर काढून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. ही सोपी ट्रिक वापरून आपण कोबी मधील किड कधीं तो स्वच्छ करून घेऊ शकतो.
४. पालकच्या पानांमधील किड कशी काढावी? हलकेच उकळवून घेतलेल्या पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालावे. मीठ व्यवस्थित विरघळल्यानंतर पालकची पाने त्यात १० मिनिटांसाठी भिजवून ठेवावीत. १० मिनिटांनंतर पाने या द्रावणातून काढून स्वच्छ पाण्यातून धुवून घेऊन मगच वापरावीत.
अशाप्रकारे आपण छोट्या - छोट्या टिप्स वापरून भाज्यांमधील किड सहजरित्या काढू शकतो.