लाडू हा फराळातील एक महत्त्वाचा पदार्थ. चिवडा, लाडू, चकली, करंजी आणि शंकरपाळे हे पदार्थ सगळ्यांकडे आवर्जून केले जातात. अनेक कुटुंबात लाडू गोड असल्याने तो सगळ्यात आधी केला जातो. काहींना रव्याचा लाडू आवडतो तर काहींना रवा-बेसनाचा, काही घरांत मात्र रवा नारळाचाच लाडू करतात. बेसनाचा लाडू हाही दिवाळीच्या फराळात भाव खाऊन जाणारा पदार्थ. भरपूर तूप, साखर घालून केले जाणारे हे लाडू म्हणजे पारंपरिक मिष्टान्नच. हे लाडू आपल्याला हवे तसे झाले तर ठिक नाहीतर ते फसतात आणि आपला सगळा मूडच जातो. असे लाडू पाहुण्यांना कसे देणार हा एक प्रश्न आणि नाही दिले तर घरात इतके संपतील का हा दुसरा प्रश्न महिलांसमोर असतो. पण होऊ नये आणि झालेच तरी हे लाडू आपल्याला झटपट नीट करता यावेत यासाठी काही सोप्या ट्रिक्स आज आपण पाहणार आहोत. यामुळे बिघडलेले लाडू नीट होण्याची शक्यता नक्कीच जास्त असते, पाहूयात या ट्रिक्स कोणत्या (How to Repair Ladoo if it goes wrong recipe Cooking tips for Diwali Faral) ...
१. रव्याचे लाडू कडक दगडासारखे होऊन चावताना दात दुखू नयेत तर...
रव्या-नारळाचे किंवा नुसत्या रव्याचे लाडू करताना ते काही वेळा वळल्यानंतर इतके कडक होतात की चावता चावले जात नाहीत. करताना आपल्याला त्याचा अंदाज येत नाही पण डब्यात भरुन ठेवल्यावर मात्र ते भलतेच कडक लागतात. असे होऊ नये म्हणून तूपाचे प्रमाण योग्य ठेवावे. तसेच पाक खूप घट्ट किंवा दाटसर न करता पाक साखर आणि पाण्याचे योग्य ते प्रमाण घेऊन पातळसर करावा. पाक तयार होत आला की त्याची तार नीट तपासून मगच त्यात रवा आणि नारळ घालावा. तसेच पाकाचे आणि रव्याचे प्रमाणही योग्य हवे नाहीतर हे लाडू कडक होण्याचीच शक्यता जास्त असते.
२. पाकातला लाडू वळला न जाता मऊ पडत असेल किंवा पाक जास्त पातळ झाला तर?
साखरेच्या पाकातला म्हणजेच रव्याचा किंवा रवा-नारळाचा लाडू फसण्याची शक्यता जास्त असते. यामध्ये पाक पातळ होण्याची किंवा लाडू वळला न जाण्याची समस्या उद्भवू शकते. अशावेळी घाबरुन न जाता किंवा वैताग न करता रवा-नारळ किंवा रवा नारळात तसाच मुरू द्यावा. किमान ६ ते ८ तास रवा यात मुरल्यानंतर पाक काही प्रमाणात घट्टसर होण्याची आणि लाडू वळले जाण्याची शक्यता असते. त्यानंतरही अगदीच नाही झाले तर यामध्ये पुन्हा थोडा रवा भाजून घालावा.
३. बेसनाचा लाडू मऊ पडू नये म्हणून
बेसन आपण तूपावर खमंग भाजून घेतो. या भाजण्यातच लाडूची सगळी मजा अवलंबून असते. लालसर छान भाजले गेले तर लाडू मस्त जीभेवर ठेवल्यावर विरघळेल असा होतो. मात्र बेसन तूप ओढून घेत असल्याने आपण नेहमीपेक्षा जास्त तूप घालायला जातो. असे झाले तर पिठीसाखर घातल्यावर हे तूप आणखीनच पातळ होते आणि लाडूचे मिश्रण एकजीव झाले तरी ते पातळ राहते. अशावेळी लाडू काही केल्या वळले जात नाहीत आणि वळले तरी ते पसरतात. मग कढईमध्ये नुसते बेसन घेऊन ते अगदी नावापुरते तूप घालून भाजावे आणि ते या मिश्रणात घालावे. हे करतानाही अंदाज घेतच करायला हवे.