भारतात स्वयंपाक करताना अनेक मसाल्यांचा वापर केला जातो. विविध मसाल्यांमुळे जेवण रुचकर बनते. मात्र, मीठ आणि लाल तिखट या दोन मुख्य गोष्टींमुळे जेवणाची रंगत वाढते. मीठ आणि लाल तिखट पदार्थात योग्य प्रमाणात पडल्यावर जेवण चवीला उत्तम होते. पण त्याचे प्रमाण जास्त झाल्यावर जेवणाची चव हमखास बिघडते. ते जेवण मग खाल्ले जात नाही. मग तो पदार्थ कितीही मनापासून किंवा कष्ट घेऊन बनवला असेल तरी, एका गोष्टीमुळे तो पदार्थ खाल्ला जात नाही. काहींवर याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. मसालेदार - खारट अन्न फेकण्यापेक्षा आपण पदार्थाला चवदार बनवू शकता. यासाठी काही ट्रिक्स आपल्याला मदत करतील.
खारट चव कमी करण्यासाठी ट्रिक
१. पदार्थात नकळत अनेकदा मीठ जास्त पडते. ज्यामुळे पदार्थ प्रचंड खारट होते. हे खारट पदार्थ बहुतांश वेळा आपण फेकून देतो. मात्र, अन्नाला फेकून न देता, आपण काही ट्रिक्सचा वापर करून पदार्थाला रुचकर बनवू शकतो. यासाठी बटाट्याचा वापर करता येईल. खारट असलेल्या पदार्थात बटाटा घाला. बटाटा त्यात शिजवून घ्या, त्यानंतर काढा. बटाटा पदार्थातील अतिरिक्त खारटपणा शोषून घेईल. याने पदार्थाची चव वाढेल.
२. बटाट्याऐवजी आपण पिठाचे छोटे गोळे वापरू शकता. पदार्थात मीठ जास्त पडले असेल तर, त्यात पीठाचे छोटे गोळे करून टाका. पीठाचे छोटे गोळे मीठ शोषून घेईल. त्यानंतर ते गोळे बाहेर काढा. याने खारटपणा कमी होईल, व पदार्थाची चव वाढेल.
गरमागरम कढीचा मारा भुरका! कढी स्वादिष्ट होण्यासाठी ३ टिप्स- खाणारे म्हणतील वाह..
३. पदार्थात आंबट पदार्थ टाकूनही मीठाची चव कमी करता येईल. यासाठी आपण पदार्थात 1-2 चमचे दही किंवा लिंबाचा रस मिक्स करू शकता. खारटपणा काही मिनिटांत निघून जाईल आणि आंबटपणा भाजीची चव वाढवेल.
पदार्थातील तिखटपणा कमी करण्यासाठी ट्रिक
१. भाजीतील तिखटपणा कमी करण्यासाठी लिंबाचा रस वापरा. लिंबाचा रसाचा वापर केल्यामुळे भाजीतील तिखटपणा कमी करता येईल. यासह त्याची चव वाढेल.
२. पदार्थात जास्त लाल तिखट पडले असेल तर, टोमॅटोची प्युरीमुळे तिखटपणा कमी करता येईल. या ट्रिकमुळे भाजीतील चव वाढेल.
३. ग्रेव्हीच्या भाजीमध्ये तिखटपणा वाढला असेल तर, काजू पेस्ट आणि क्रीम मिक्स करा. याशिवाय दहीचा देखील वापर करता येईल. यामुळे तिखटपणा कमी होईल.
४. भाजीत तूप घातल्यानेही तिखटपणा कमी करता येईल. यासाठी भाजीवरून तूप मिक्स करा. यामुळे तिखटपणा कमी होईल, जेवणाची चवही वाढेल.