Join us  

छोले-राजम्याचा बेत करायचाय, पण भिजवायलाच विसरलात? पाहा सोपी ट्रिक, तासाभरात छोले भिजतील मस्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2023 12:25 PM

How to Soak Beans Immediately Trick by Chef Pankaj Bhadauria : शेफ पंकज भदौरीया सांगतात ही खास ट्रीक...

ठळक मुद्देअगदी झटपट छोले भिजवण्याची सोपी ट्रीक..भिजवायला विसरलात तरी चिंता करु नका, तासाभरात होईल काम

आपल्याला सतत तीच ती भाजी-पोळी किंवा भात खाऊन कंटाळा येतो. मग कधीतरी आपल्याला चविष्ट, चमचमीत काहीतरी वेगळं हवं असतं. अशावेळी आपण ग्रेव्ही असलेले छोले किंवा राजमा करण्याचा बेत करतो. कडधान्य करायची म्हटली की ती आठवणीने आदल्या दिवशी भिजत घालावी लागतात. पण घाईगडबडीत आपण विसरलो तर मात्र ऐनवेळी आपल्याला दुसरं काहीतरी करुन वेळ मारुन न्यावी लागते. पण विकेंडला पाहुणे येणार म्हणून किंवा सुट्टीच्या दिवशी छोले- भटुरे किंवा राजमा-चावलचा बेत करायचा असेल आणि ते आपण भिजत टाकायला विसरलो तरी चिंता करु नका. कारण एका तासात छोले भिजवण्याची सोपी ट्रिक आज आपण पाहणार आहोत (How to Soak Beans Immediately Trick by Chef Pankaj Bhadauria). 

प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरीया यांनी ही खास ट्रिक आपल्याशी शेअर केली आहे. पंकज भदौरीया आपल्या युट्यूब आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी काही ना काही रेसिपी किंवा स्वयंपाकातील सोप्या ट्रिक्स शेअर करत असतात. आताही त्यांनी पंकज के नुसके यामध्ये तासाभरात छोले किंवा राजमा कसा भिजवायचा याची सोपी ट्रिक शेअर केली आहे. यामुळे तुम्ही अगदी काही तास आधी छोले किंवा राजमा करायचा प्लॅन केलात तरी चालू शकते. पाहूया तासाभरात या दोन्ही गोष्टी भिजण्यासाठी आणि छान फुलण्यासाठी काय करायचं.  

ऐनवेळी छोले-राजमा भिजवण्यासाठी काय करायचं? 

१.     यासाठी आपल्याला फक्त दोनच गोष्टी लागणार आहेत. पोळी किंवा भाकरी गरम राहतात असा डबा म्हणजेच कॅसरोलचा डबा आणि गरम पाणी.

२. या डब्यात छोले घालून त्यात गरम पाणी घालायचे आणि डब्याचे झाकण घट्ट बंद करायचे. 

३. तासभर या डब्याला अजिबात हात न लावता बाजूला ठेवून द्यायचा. गरम पाणी आणि या डब्यातल्या उबेमुळे छोले तासाभरात पूर्ण फुलून वर येतात. 

४. तासाभराने या डब्याचे झाकण उघडल्यावर छोले किंवा राजमा नेहमीसारखे पूर्ण भिजलेले दिसतील. त्यामुळे आपण हे काम करायचे विसरलो तरी चिंता करु नका, ही सोपी ट्रिक वापरुन आपण हे दोन्ही तासाभरात भिजवू शकतो. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.