फळं खाणं आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं, त्यामुळे रोजच्या आहारात फळांचा आवर्जून समावेश असायला हवा असं आपण वारंवार वाचतो, ऐकतो. सिझनल फळं तर खायला हवीतच, पण ताकद देणारी आणि शरीराचे पोषण करणारी फळं आवर्जून खायला हवीत. सफरचंद तर आपल्याकडे १२ महिने मिळणारं आणि आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त फळ मानलं जातं. त्यामुळेच अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सगळ्यांना आपण आवर्जून सफरचंद खायला देतो (How To Store Apple Slices 2 Simple Tricks).
पण सफरचंद कापलं की लगेच खावं लागतं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे चिरुन ठेवल्यावर ते लगेच खाल्लं नाही तर ते काळं पडतं. मात्र अनेकदा आपल्याला एकावेळी इतकं सफरचंद जात नाही. तसंच सफरचंद डब्यात न्यायचं म्हटलं की ते काळं पडण्याची शक्यता असते. तसंच ते मऊ होतं आणि खायलाही नको वाटतं. असं सफरचंद फ्रिजमध्ये ठेवलं तरी ते तसंच होतं. म्हणूनच आज आपण अशा २ सोप्या ट्रिक्स पाहणार आहोत की ज्यामुळे सफरचंद चिरुन ठेवलं तरी काळं तर पडत नाहीच पण ते आहे तसंच छान कडक राहतं. पाहूयात या ट्रिक्स कोणत्या आणि त्या कशा करायच्या.
१. पहिली ट्रीक प्रसिद्ध शेफ पूनम देवनानी यांनी शेअर केली असून ती अतिशय सोपी आहे. सफरचंदाच्या बारीक फोडी केल्यानंतर एका बाऊलमध्ये पाणी घ्यावं. त्यामध्ये मध घालावा आणि तो या पाण्यात चांगला मिसळावा. त्यानंतर या कापलेल्या फोडी या पाण्यात घालून त्या या पाण्यात चांगल्या घोळून घ्याव्यात. मग बाहेर काढून या फोडी आपण डब्यात भरुन ठेवू शकतो. यामुळे सफरचंदाच्या फोडींवर मधाचा एकप्रकारचा कोट तयार होतो आणि या फोडी काळ्या न पडता बराच वेळ आहेत तशाच राहतात.
२. तर दुसरी ट्रिक ही इन्स्टाग्रामवरील प्रिती भुत्रा यांनी शेअर केली असून त्या पॅरेंटींग विषयाबाबत नेहमी काही ना काही महत्त्वाची माहिती शेअर करत असतात. त्यांच्या म्हणण्यानुसार एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मीठ घालावे. त्यानंतर या सफरचंदाच्या फोडी या पाण्यात घालाव्यात. म्हणजे मीठामुळे त्या काळ्या न पडता आहेत तशाच राहतात. मुलांना आवडत असेल तर यावर लिंबू पिळले तरी चालते असेही त्यांचे म्हणणे आहे. अशा फोडी डब्यात भरल्या तरी त्या बराच काळ काळ्या पडत नाहीत.