कडीपत्ता हा मसाल्याच्या पदार्थांपैकी एक अतिशय महत्त्वाचा पदार्थ आहे. पदार्थाला स्वाद येण्यासाठी आपण फोडणीत आवर्जून कडीपत्ता वापरतो. कडीपत्ता आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असल्याने कडीपत्ता खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जातो. बाजारातून आपण कडीपत्ता आणतो खरा पण तो फारतर एक किंवा दोन दिवस चांगला राहतो, नंतर लगेचच वाळून जातो. कडीपत्ता एकदा वाळला की त्याचा स्वाद तर कमी होतोच पण फोडणीत घातला तरी त्याची विशेष चव लागत नाही. मग एकतर आपण तो टाकून देतो किंवा त्याची पूड करुन ठेवतो (How To Store Curry leaves for 8 to 10 Days).
पण हिरवागार कडीपत्ता असेल तर तो पदार्थात घालायलाही छान वाटतो. बाजारात अगदी ५ ते १० रुपयांत कडीपत्त्याची मोठी जुडी मिळते. आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असणारा आणि जेवणाचा स्वाद वाढवणारा हा कडीपत्ता बरेच दिवस तसाच राहावा यासाठी काय करता येईल? याचीच एक सोपी ट्रिक आज आपण पाहणार आहोत. ज्यामुळे हा कडीपत्ता ८ ते १० दिवस आहे तसाच छान हिरवागार राहू शकतो. अरुणा गुप्ता इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ही सोपी ट्रीक शेअर करतात.
१. सुरुवातीला कडीपत्ता वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायचा. म्हणजे त्याला असणारी माती, इतर घाण निघून जाण्यास मदत होते.
२. त्यानंतर १० मिनीटे त्यातील पाणी निथळण्यासाठी तो तसाच ठेवायचा. पण इतका वेळ नसेल तर एक सुती कापड किंवा टिश्यू पेपर घेऊन त्यात ही जुडी बांधून कडीपत्ता थोडा पुसून कोरडा करुन घ्यायचा. मात्र वाळवायचा म्हणजे उन्हात ठेवायचा नाही, कारण उन्हात ठेवला तर तो लगेच वाळून जाईल.
३. मग हा कडीपत्ता २ प्रकारे साठवता येतो. एकतर याची पाने काढून एका डब्यात ठेवायची. किंवा मोठ्या दांडीपासून लहान दांड्या वेगळ्या करुन दांड्यांसकट हा कडीपत्ता एका मोठ्या डब्यात ठेवायचा.
४. अशाप्रकारे तो डब्यात काढून ठेवायला केवळ ५ मिनीटे लागतात. मात्र त्यामुळे कडीपत्ता जास्त दिवस ताजातवाना राहू शकतो. डब्याचे झाकण घट्ट लावून ठेवायचे म्हणजे ऐनवेळी आपल्याला झटपट हा कडीपत्ता वापरता येतो.