दिवाळी म्हटली की घरातील लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वेध लागतात ते दिवाळीच्या फराळाचे. चिवडा, चकली, शेव, करंजी, लाडू अशा वेगवेगळ्या चटपटीत पदार्थांनी मस्त सजलेली थाळी म्हणजे खरी दिवाळी. पूर्वी हे पदार्थ फक्त दिवाळीतच मिळायचे म्हणून त्याचे अप्रूप जास्त होते. आज अगदी वर्षभरात कधीही हे पदार्थ खायला मिळत असले तरी दिवाळीत ते करण्याची, खाण्याची मजा काही औरच. सध्या बाजारात किंवा अगदी घरगुती पद्धतीने केलेले हे पदार्थ सहज मिळतात. पण स्वतःच्या हाताने बनवलेल्या फराळाची सर आणि मजा त्यात नाही हे नक्की (how to store Diwali faral simple tips for crispy chivda, chakli, shev).
सध्या बदललेल्या वातावरणामुळे हिवाळ्यात येणारी दिवाळी हल्ली पावसाळ्यात येते का? असा प्रश्न पडतो. एकीकडे ऑक्टोबर हिट संपून थंडी पडण्याची चाहूल लागत असताना यंदाही अचानक पाऊस सुरू झाला आहे. अशात फराळाचे पदार्थ कुरकुरीत राहतील का असा प्रश्न स्वाभाविकच महिलांना पडतो. फराळातील चिवडा, शेव, चकली कुरकुरीत राहीली तरच मजा आहे. नाहीतर या पदार्थांकडे कोणी फिरकतही नाही. पावसाळी हवेत फराळ सादळण्याची सर्वात पहिली भीती ही चिवड्याची असते, असे होऊ नये यासाठी चिवडा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या पाहूया..
चिवडा सादळू नये म्हणून
१. पातळ पोहे, जाड पोहे किंवा अगदी चुरमुर्याचा चिवडा असो पहिले ते नीट चाळून घेत मोठ्या पसरट कढईत मंद आचेवर सावकाश भाजून घ्यावे.
२. भाजताना पोहयांचा किंवा चुरमुर्यांचा रंग बदलू नये किंवा करपू नये याची काळजी घ्यावी.
३. चिवड्यात घालायचे जिन्नस उदाहरणार्थ खोबर्याचे काप, मिरच्या, कढीपत्ता गरम तेलात अगदी खरपूस तळून घ्यावे. यातील काही मऊ राहीले तर चिवडा मऊ पडतो.
४. भाजलेले पोहे ताटात न काढता पेपरवर पसरवून गार करावे.
५. केलेली फोडणी पोहयांवर गरम न ओतता थोडी कोमट करून घालावी.
६. सर्व मिश्रण एकत्र करून कालवल्यावर गरम गरम डब्यात किंवा पिशवीत भरू नये. चिवडा नीट थंड झाला की मग भरून ठेवावा.
बनवलेला फराळ कुरुकुरीत राहण्यासाठी कसा साठवावा?
१) शेव, चिवडा, चकली यापैकी कोणताही पदार्थ एकदम एकत्र म्हणजे एका डब्यात किंवा पिशवीत न ठेवता. २ ठिकाणी वेगवेगळे ठेवावे. म्हणजे एखादा चुकून सादळलाच तर दुसरीकडचा चांगला राहू शकतो.
२) प्रत्येक पदार्थ सील झीपच्या किंवा पिशवीला लावायला लॉक मिळतात ते लावून हवाबंद राहील असाच ठेवायचा. काहीवेळा आपण रबर लावतो पण ते घट्ट नसेल तर त्यातून ही हवा आत जाते आणि चिवडा किंवा शेव सादळते.
३) प्रत्येक वेळी चिवडा, शेव घेण्यासाठी वेगवेगळे चमचे न वापरता एकच चमचा त्यात घालून ठेवावा. म्हणजे चमच्याच्या ओलाव्याने पदार्थ सादळणार नाही.
४) फरळाच्या पिशव्या डब्यात भरताना खाली थोडे तांदूळ पसरवून ठेवावे. जेणेकरून डब्यातली आर्द्रता तांदूळ शोषून घेतील आणि चकली, शेव कुरकुरीत राहतील.