Join us  

सुकं खोबरं -शेंगदाणे महिनोंमहिने चांगले टिकवून ठेवण्यासाठी ३ उपाय, ना किड लागेल, ना वास येईल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2022 12:53 PM

Tricks and Tips To Store Dry Coconut and Peanuts: शेंगदाण्यांना काही दिवसांतच किड लागते, अळ्या होतात आणि खोबऱ्याचंही तसंच.. लगेच खोबऱ्याचा वास येऊ लागतं आणि ते बेचव होऊन जातं. म्हणूनच तर हे बघा काही खास उपाय.

ठळक मुद्देअशा पद्धतीने ठेवलेलं खोबरं पुढील कित्येक महिने खराब होणार नाही. 

स्वयंपाक घरातले पदार्थ योग्य पद्धतीने साठवून ठेवायचे, हे खरं तर खूपच कौशल्याचं काम. त्यात जरा जरी हयगय झाली तरी पदार्थ खराब होतो आणि मग पैसेही वाया जातात. त्यातल्या त्यात रवा, खोबरे (storage of dry coconut), शेंगदाणे (peanut) हे पदार्थ सांभाळायचे म्हणजे आणखीनच बारकाईने करण्याचं काम. कारण शेंगदाण्यांकडे जरा जरी दुर्लक्ष झालं तरी लगेचच दाणे खराब होऊ लागतात, त्यांना किड लागून अळ्या होतात. आणि सुक्या खोबऱ्याला तर अगदीच कुबट, खऊट वास येऊ लागतो. म्हणूनच तर या लेखात आपण शेंगदाणे आणि सुकं खोबरं हे दोन्ही पदार्थ योग्य पद्धतीने कसे साठवून ठेवायचे, जेणेकरून ते महिनोंमहिने चांगले राहतील, याची माहिती घेणार आहोत. (Tricks and Tips To Store Dry Coconut and Groundnut)

 

खोबरे अनेक महिने चांगले ठेवण्यासाठी....१. बाजारातून जेव्हा सुक्या खोबऱ्याची वाटी आणली जाते तेव्हा आपण ती जशीच्या तशीच उचलतो आणि डब्यात ठेवून देतो. यामुळेच बऱ्याचदा खोबरं खराब होतं. म्हणून खोबरं भरून ठेवण्याआधी काही गोष्टी करणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी तर खोबऱ्याच्या वाट्या एखादा तास एखाद्या कागदावर पसरून ठेवा. त्यानंतर एका बाऊलमध्ये एक कप पाणी घ्या आणि त्यात एक ते दिड टेबलस्पून मीठ टाका. मीठ पाण्यात व्यवस्थित विरघळू द्या. यानंतर एखाद्या स्वच्छ नॅपकीनचे टाेक मिठाच्या पाण्यात बुडवा आणि त्याने सुक्या खोबऱ्याची वाटी आतून- बाहेरून पुर्णपणे पुसून घ्या. यानंतर खोबरं थोडं सुकू द्या. खोबरं सुकल्यानंतर एका कपमध्ये थोडं खोबऱ्याचं तेल घ्या आणि ते बोटाने किंवा कॉटनच्या कपड्याने खोबऱ्याच्या वाटीला आतून बाहेरून लावा. एका खोबऱ्याच्या वाटीला तेलाने किमान अर्धा मिनिट तरी चोळावे. यानंतर तेल लावलेल्या सगळ्या खोबऱ्याच्या वाट्या कडक उन्हात २ दिवस वाळू द्या. त्यानंतर त्या एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरा. पिशवीचे तोंड गाठ मारून किंवा रबर लावून पुर्णपणे पॅक करा. ही पिशवी स्टीलच्या हवा बंद डब्यात ठेवून द्या. अशा पद्धतीने ठेवलेलं खोबरं पुढील कित्येक महिने खराब होणार नाही. 

 

२. सुकं खोबरं साठविण्यासाठी तुरटीचाही वापर करता येतो. यासाठी एका बाऊलमध्ये एक कप पाणी घ्या. त्यात १ टेबलस्पून तुरटी टाका. तुरटी पाण्यात पुर्णपणे विरघळली की स्वच्छ नॅपकीनचे एक टोक त्या पाण्यात बुडवा आणि खोबऱ्याची वाटी आतून- बाहेरून पुसून घ्या. आता अशी खोबऱ्याची वाटी दोन दिवस उन्हामध्ये वाळू द्या. यानंतर ऊन दाखवलेले खोबरे एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरा. पिशवीचे तोंड गाठ मारून किंवा रबर लावून पुर्णपणे पॅक करा. ही पिशवी स्टीलच्या हवा बंद डब्यात ठेवून द्या.

 

३. शेंगदाणे महिनोंमहिने चांगले रहावेत, यासाठी मीठाचा वापर करता येतो. यासाठी एक कप पाणी घ्या. त्यात एक ते दिड टेबलस्पून मीठ टाका. मीठ पाण्यात पुर्णपणे विरघळले की हे मिठाचे पाणी शेंगदाण्यांवर शिंपडा. खूप जास्त पाणी टाकू नका. त्यानंतर अर्धा ते एक मिनिट शेंगदाणे हाताने खालीवर करत रहा, जेणेकरून मीठाचे पाणी शेंगदाण्यांना सगळीकडून लागेल. त्यानंतर हे शेंगदाणे २ दिवस उन्हात वाळू द्या. त्यानंतर ज्या पद्धतीने आपण खोबरे ठेवले, त्याच पद्धतीने शेंगदाणेही प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवा. 

 

 

टॅग्स :अन्नकिचन टिप्सस्वच्छता टिप्स