कोथिंबीर, पुदिना हे आपल्या रोजच्या आहाराचा एक महत्वपूर्ण भाग आहे. कोणताही छान गरमागरम पदार्थ केला की त्यावर छान कोथिंबीर भुरभुरवून घातली की त्या पदार्थाला आणखीनच चव येते. जेवण अधिक स्वादिष्ट व रुचकर लागण्यासाठी कोथिंबीर व पुदिना हे हिरवे मसाले अतिशय उपयुक्त ठरतात. कोथिंबीर, पुदिन्याचा वापर करून आपण त्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या किंवा कोथिंबीर वडी सारखे खमंग, खुसखुशीत पदार्थ तयार करु शकतो. पुदिना चटणी, कोशिंबीर, भजी किंवा एखाद्या पेयाची चव वाढवण्यासाठी पुदिन्याचा वापर केला जातो. पदार्थांची चव वाढण्यासोबतच पुदिन्यामुळे आपली पचन प्रक्रिया देखील सुरळीत सुरू राहते. घरोघरी वापरल्या जाणाऱ्या कोथिंबीरची पाने खूपच फायदेशीर असतात. कोथिंबीरच्या पानामध्ये प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, कॅरोटीन, थायामिन, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे घटक सापडतात.
कोथिंबीर - पुदिना हे असे पदार्थ आहेत की जे रोजच्या जेवणात लागतात. त्यामुळे हे रोज लागणारे पदार्थ आपण आठवडाभर पुरतील या हिशोबाने एकदाच बाजारांतून खरेदी करून फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवतो. परंतु पुदिना व कोथिंबीर जास्त काळ फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवल्यास त्यांचा स्वाद कालांतराने नाहीसा होतो. एवढेच नव्हे तर कोथिंबीर - पुदिना व्यवस्थित स्टोअर करून ठेवला नाही तर तो लगेच खराब होऊ लागतो. अशावेळी कोथिंबीर, पुदिना जास्त दिवस टिकून राहण्यासाठी व त्यांचा स्वाद तासाच्या तसा टिकवण्यासाठी नेमके कोणत्या पद्धतीने स्टोअर करून ठेवावेत ते पाहूयात(How To Store Mint & Coriander Leaves For a Long Time).
पुदिना - कोथिंबीर दीर्घकाळ टिकण्यासाठी स्टोअर करून ठेवण्याची सोपी पद्धत...
पुदिना - कोथिंबीर दीर्घकाळ टिकण्यासाठी कसे स्टोअर करून ठेवावेत ?
१. शक्यतो मुळं असलेला पुदिनाच खरेदी करावा. त्यानंतर घरी आल्यावर पुदिन्याच्या मुळांवर असलेली माती स्वच्छ धुवावी. पुदिना आठवडाभर टिकवण्यासाठी त्याची मुळे पाण्यात ठेवावीत. ( पाणी खराब झाल्यास बदलत रहावं.) शक्यतो पुदिन्याची मुळं व देठ काढून केवळ पानंच स्टोर करावीत. असं केल्यामुळे पुदिना १५ दिवस टिकतो. पुदिना धुवून झाल्यावर अर्धा तास उन्हात किंवा फॅनखाली वाळवून घ्या. ज्यामुळे त्याच्यातील ओलावा निघून जाईल. पेपर किंवा टिश्यूमध्ये पुदिना रॅप करुन ठेवा. पुदिना झीपलॉक बॅगमध्ये ठेवल्यास महिनाभर छान टिकतो. पुदिन्याची पानं काढून ती आइस ट्रेमध्ये भरून देखील स्टोर करता येऊ शकतात. या आइस क्यूब्स तुम्ही कधीही वापरु शकता. पुदिना जास्त काळ साठवायचा असेल तर त्याची पावडर बनवा. यासाठी तुम्ही आधी पुदिना धुवा आणि टॉवेलच्या साहाय्याने अतिरिक्त पाणी काढून टाका. यानंतर, तुम्ही पुदिन्याची पाने तोडून घ्या. आता ४-५ दिवस कोरडे होऊ द्या. पुदिन्याची पाने चांगली सुकल्यावर बारीक करून पावडर बनवा. आपण एका वर्षासाठी अशा प्रकारे साठवू शकता.
२. पुदिना किंवा कोथिंबीर स्टोअर करून फ्रिजरमध्ये ठेवताना तो नेहमी हवाबंद डब्यांत भरून ठेवावा. सर्वप्रथम एका डब्यांत खाली टिश्यू पेपर अंथरुन घ्यावा. आता त्यावर पुदिना - कोथिंबिरची निवडून घेतलेली पाने ठेवावीत. आता त्यावर अजून एक टिश्यू पेपर ठेवून ही पाने व्यवस्थित झाकून घ्यावीत. त्यानंतर हा डबा व्यवस्थित फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवावा. त्यानंतर ३ ते ४ दिवसांनी त्यातील काही पाने काळी पडली असतील तर ती काढून टाकावीत. दर ४ ते ५ दिवसांनी टिश्यूपेपर बदलून घ्यावा. असे केल्यास, कोथिंबीर - पुदिना १५ ते २० दिवस व्यवस्थित टिकून राहतात.
कारल्याची भाजी कडू न होण्यासाठी ८ टिप्स, नावडतं कारलंही होईल आवडत-ं भाजी अशी चमचमीत...
उरलेला शिळा ब्रेड ताजा करण्याची १ जादूई ट्रिक, शेफ पंकज भदौरिया सांगतात...
३. सर्वात आधी कोथिंबीरीचे देठ कापून टाका. त्यानंतर एका भांड्यात थोडे पाणी घ्या आणि त्यात चमचाभर हळद घाला. त्यात कोथिंबीर ३० मिनिटे भिजत ठेवा. त्यानंतर कोथिंबीर बाहेर काढून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि मग सुकवा. आता एका टिश्यू पेपरने ती स्वच्छ करा. त्यानंतर एका एअरटाईड कंटेनरमध्ये टिश्यू पेपर घालून त्यावर कोथिंबीर पसरवून ठेवा. त्यानंतर वरुनही टिश्यू पेपर लावून डबा बंद करा. यात पाण्याचा अंश राहणार नाही याची खबरदारी घ्या. मग एअरटाईड कंटेनरचे झाकण बंद करुन फ्रिजमध्ये ठेवा. असे केल्याने कोथिंबीर दीर्घकाळ टिकेल.