हिवाळ्याच्या दिवसात खूप भूक लागते. विशेषत: संध्याकाळी. चिवडा, भडंग, फरसाण, बिस्किटं, बाकरवड्या हे नेहमीचे पर्याय सोडून चहासोबत काहीतरी मस्त चटपटीत खावंसं वाटतं. अशा वेळेस पटकन होईल असा चटपटीत प्रकार म्हणजे कटलेट. ओट्स, बटाटा आणि पोहे असे तीन प्रकारचे कटलेट चटपटीत खाण्याची भूक भागवू शकतात. तसेच हे कटलेट खाल्ल्यानंतर रात्रीच्या जेवणाला साधी खिचडी किंवा भाज्यांचं सूप केलं तरी चालतं.
Image: Google
ओट्स कटलेट
संध्याकाळी चहासोबत जर ओट्स कटलेट केले तर चटपटीत आणि पौष्टिक अशा दोन्ही गरजा पूर्ण होतात. ओट्स हे आरोग्यासाठी उत्तम असतात. ओट्सचा अशा प्रकारे आहारात समावेश केला तरी तो फायदेशीर ठरतो.ओट्स कटलेट करण्यसाठी 1 कप रोस्टेड ओट्स, 2 उकडलेले बटाटे, अर्धा कप पनीर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लसूण-आल्याची पेस्ट, अर्धा कप तेल, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे ब्रेडचा चुरा एवढी सामग्री घ्यावी.
ओट्स कटलेट करताना सर्वात आधी बटाटे उकडून ते सोलून कुस्करुन घ्यावेत. त्यात रोस्टेड ओट्स घालून ते चांगलं मिसळून घ्यावं. थोडा वेळ हे मिश्रण सेट होवू द्यावं. एक 5-10 मिनिटानंतर या मिश्रणात पनीर, लसूण-आल्याची पेस्ट, लाल तिखट, मीठ आणि गरम मसाला घालून सर्व नीट मिसळून घ्यावं. हे मिश्रण पुन्हा 10 मिनिटं सेट होवू द्यावं.10 मिनिटानंतर मिश्रणाचे छोटे गोळे घेऊन त्याला कटलेटसारखा लंब आकार द्यावा. सर्व कटलेट करुन एका ताटात ठेवावे. कढईत तेल गरम करावं. कटलेट ब्रेडच्या चुर्यात घोळून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. कटलेट तळताना गॅसची आच मध्यम ठेवावी. हे कटलेट कोथिंबीर-पुदिन्याच्या हिरव्या चटणीसोबत छान लागतात.
Image: Google
बटाट्याचे पंजाबी कटलेट
बटाट्याचे कटलेट हे प्रसिध्द स्ट्रीट फूड असून ते घरीही सहज तयार करता येतात. बटाट्याचे पंजाबी कटलेट करण्यासाठी 1 कप उकडलेले बटाटे, अर्धा कप उकडलेले ताजे वाटाणे, अर्धा चमचा चाट मसाला, दिड चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल घ्यावं.
बटाट्याचे कटलेट करताना सर्वात आधी उकडलेले बटाटे सालं काढून ते किसून घ्यावेत. नंतर कटलेटसाठीची सर्व सामग्री त्यात घालावी. बटाट्याचं हे मिश्रण चांगलं मिसळून घ्यावं. मिश्रणाचे छोटे छोटे गोल गोळे करुन ते हाताने थोडे दाबून त्याला टिक्कीसारखा आकार द्यावा. नॉन स्टिक पॅन गरम करावा. तव्याला थोडं तूप लावावं. मध्यम आचेवर हे कटलेट दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर शेकून घ्यावेत. कटलेट कुरकुरीत लागायला लागले की ते काढून घ्यावेत. सॉसपेक्षाही कोथिंबीर आणि पुदिन्याच्या हिरव्या पोष्टिक चटणीसोबत हे कटलेट छान लागतात.
Image: Google
पोह्याचे कटलेट
सकाळी नाश्त्याला पोहे खाण्याला आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्व आहे. याच पोह्यांचा संध्याकाळसाठीचा चटपटीत प्रकार म्हणजे पोह्यांचे कटलेट. हे कटलेट कमी सामग्रीत पटकन होतात.पोह्यांचे कटलेट करताना 2 कप पोहे, 2 उकडलेले बटाटे, पाव कप किसलेलं पनीर, पव कप किसलेलं गाजर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा मिरेपूड, 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, थोडं बारीक चिरलेलं आलं ( हवं तर आलं किसून घ्यावं), 2 बारीक चिरलेल्या मिरच्या, 1 चमचा लिंबाचा रस, 2 चमचे मैदा, 4 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा कप ब्रेडचा चुरा, चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार तेल घ्यावं.
पोह्यांचं कटलेट करताना पोहे निवडून काही सेकंद पाण्यानं धुवून घ्यावेत. धुतलेले पोहे 10 मिनिटं कोरडे होण्यासाठी ठेवावे. उकडलेले बटाटे सोलून ते चांगले कुस्करावेत किंवा किसून घ्यावेत. एका भांड्यात भिजवलेले पोहे, किसलेला बटाटा, किसलेलं गाजर , पनीर, मीठ, मिरेपूड, गरम मसाला, चाट मसाला, लाल तिखट, किसलेलं आलं, कोथिंबीर आणि लिंबाचा रस हे सर्व एकत्र करावं. हे मिश्रण चांगलं मळून घ्यावं. एका वाडग्यात मैदा घ्यावा. त्यात पाणी घालून त्याची पातळ पेस्ट करावी. या पेस्टमधे थोडं मीठ आणि मिरेपूड घालून ते चांगलं मिसळून घ्यावं. मग कटलेटच्या मिश्रणाचे छोटे गोळे घेऊन त्यांना गोल किंवा लांबट आकार द्यावा. सर्व कटलेट करुन एका ताटात ठेवावे. नॉन स्टिक पॅनमधे थोडं तेल गरम करावं. कटलेट आधी मैद्याच्या पातळ पेस्टमधे बुडवून नंतर लगेच ब्रेडच्या चुर्यात घोळवून घ्यावेत. हे कटलेट पॅनमधे तेलावर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर शेकून घ्यावेत. हे कटलेट कोथिंबीर आणि पुदिन्याच्या चटणीसोबत गरम गरम खावेत.