थंडीच्या दिवसांत शरीर जास्त ऊर्जा खर्च करत असल्याने ठराविक वेळाने भूक लागते. थंडीमुळे आपण रात्रीही पांघरुण घेऊन लवकर झोपतो आणि सकाळीही लवकर जाग येत नाही. अशावेळी पोट जास्त काळ रिकामे राहते. त्यामुळे झोपेतून उठल्या उठल्या सडकून भूक लागते. आता झोपेतून उठल्यावर लगेच काय खाणार तेही कुडकुडत्या थंडीत असा प्रश्न तुम्हाला कदाचित पडत असेल. तर थंडीच्या दिवसांत उपाशीपोटी काही गोष्टी खाल्ल्याने तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. थंडीमुळे कडक चहा किंवा कॉफी प्यावी असे आपल्याला वाटू शकते. पण त्यापेक्षा सकाळी रिकाम्या पोटी काही हेल्दी पदार्थ खाल्ले तर दिवसभर तुमची ऊर्जा टिकून राहायला मदत होईल. या गोष्टी तुम्ही झटपट खाऊ शकता. त्यामुळे पुढच्या कामांसाठीही तुम्हाला तरतरी येईल आणि नाश्ता तयार होईपर्यंत तुम्ही तग धरु शकाल.
१. खजूर - खजूर उष्ण असल्याने तुम्ही झोपेतून उठल्यावर थंडीच्या दिवसांत खजूर नक्की खाऊ शकता. यातही काळे खजूर असतील तर आणखी चांगले. खजूराच्या तीन ते चार बिया स्वच्छ धुवून त्यावर तूप घालून खाल्ल्यास ते पचण्यासही चांगले. खजूर गोड असल्याने तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळते. खजूरामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असल्याने खजूर खाणे अतिशय चांगले.
२. सुकामेवा - सकाळी उठल्यावर रात्रभर भिजवलेले बदाम, काळ्या मनुका खाल्ल्यास तुम्हाला काही वेळासाठी एनर्जी मिळते. तसचे आक्रोड, काजू यांसारखा सुकामेवाही झोपेतून उठल्यावर खाण्यासाठी अतिशय चांगला पर्याय असू शकतो. सुकामेवा खाण्याचे इतरही अनेक फायदे असतात. सुकामेव्याऐवजी मूठभर दाणेही पाण्यात भिजवून खाऊ शकता.
३. फळे - थंडीच्या दिवसांत बाजारात फळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. चिकू, पपई, अंजीर, सफरचंद यांसारखी फळे चिरुन खाल्ल्यास पटकन भूक शमण्यास मदत होते. तसेच फळांमध्ये फ्रुक्टोज आणि सुक्रोज या नैसर्गिक स्वरुपात असल्याने फळे खाणे केव्हाही चांगले. तसेच फळांमध्ये असणाऱ्या फायबरमुळे पोट साफ होण्यासही मदत होते.
४. दूध - थंडीच्या दिवसांत सतत काहीतरी गरम घ्यावेसे वाटते. त्यामुळे शरारीला आणि घशालाही बरे वाटते. अशावेळी कपभर गरम दूध प्यायल्यास चांगले तर वाटतेच. पण दुधामध्ये प्रोटीनचे प्रमाण चांगले असल्याने दिवसाची सुरुवात चांगली होते. यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर एखादी प्रोटीन पावडर, सुकामेव्याची पावडर, थोडे नाचणी किंवा सातूचे पीठ असे घालूनही तुम्ही घेऊ शकता. चहा आणि फॉफीला हा उत्तम पर्याय होऊ शकतो.