गेल्या हजारो वर्षांपासून भारत हा आंब्याच्या उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. भारतातील आंब्याच्या लोकप्रियतेनं जग व्यापलं आहे. आंब्याचा रंग-गंध-चवीनं मंत्रमूग्ध व्हायला होतं. आणि म्हणूनच आजही उन्हाळ्याची खास आंब्यासाठी म्हणून आतूरतेनं वाट पाहिली जाते. आंबा हा फक्त अफलातून चवीसाठीसाठीच खाल्ला जातो. पण आरोग्य आणि आहार तज्ज्ञ हे आंब्यातील आरोग्यदायी गूणांचा विचार करुन आंबा खाण्याच आग्रह करतात. आपल्याकडे जे आहे त्याचं महत्त्वं आपल्याला पटत नाही हेच खरं. आंब्याच्या बाबतीतही तसंच आहे. आहारतज्ज्ञ ॠजूता दिवेकर यांची याबाबतीतली फेसबूक पोस्ट विचार करायला लावणारी आहे. आंब्याचा चवीसोबतच आरोग्यदायी फायद्यांसाठी आहारात समावेश का करावा? याचं कारण त्यांनी अगदी मोजक्या शब्दात सांगितलं आहे. तसंच हातातलं सोडून पळत्याच्या मागे धावण्याच्या मानवी प्रवाृत्तीवरही त्यांची ही पोस्ट बोट ठेवते. त्या म्हणतात की आंब्यात मोठ्या प्रमाणात अॅण्टिऑक्सिडण्टस ,फायबर, क जीवनसत्त्वं मोठ्या प्रमाणात असतं. पण आपण याच गुणधर्मांसाठी ग्रीन टी, ओटस, गोळ्या औषधं घेतो. आपण हे घेतो ते त्यातले गुण बघून नाही तर फूड इंडस्ट्री हे आपल्यावर बिंबवते की ते का गरजेचं आहे. अशा गोष्टींचं आकर्षक पॅकेजिंग करुन या गोष्टी आपल्याला विकल्या जातात. आणि फूड इंडस्ट्री बक्कळ फायदा कमावतात. नेमक्या याच कौशल्याचा आपल्या शेतकऱ्यांमधे अभाव आहे.
या पोस्टमधून आपण आंब्याकडे आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही पाहायला हवं याकडे आहारतज्ज्ञ ॠजूता दिवेकर आपलं लक्ष वेधतात. आंब्यातील गुणधर्म आरोग्यास विविध प्रकारे लाभदायक असतात. आरोग्यतज्ज्ञांनीही आंब्यातील गुणधर्मांचं विश्लेषण केलं आहे. आंबा हा चवीसाठी खावाच पण त्यातले आरोग्यदायी गुणधर्म समजून घेऊन त्याचा डोळसपणे आहारात समावेश करावा. आंब्याचा निम्मा हंगाम सरला असला तरी अजून बरेच दिवस आंबा बाजारात मिळणार आहे.
आंबा खावा कारण ...- आंब्यानं पचनक्रिया सूधारते. आंब्यात असलेल्या विकरांमूळे प्रथिनांचं पचन होण्यास मदत होते. तसेच आंब्यात मोठ्या प्रमाणात तंतूमय घटक असल्यानं आपली पचनक्रिया सूरळीत ठेवण्यासठी आंबा फायदेशीर आहे. आंब्यात तंतूमय घटक असल्यानं टाइप टू मधूमेहचा धोका कमी होतो. पिकलेल्या आंब्यापेक्षाही कच्च्या कैरीत पेक्टीन हा तंतूमय घटक जास्त असतो.
- आंब्याच्या सालीत पचनास उपयूक्त प्रिबायोटिक तंतूमय घटक असतात. ज्यामूळे पोटाच्या आतड्यात पचनक्रियेस मदत करणारे चांगले जिवाणू वाढतात. आरोग्य चांगलं राहाण्यासाठी आतड्यांचं आरोग्य सूदृढ असणं महत्त्वाचं असतं. आतडे निरोगी नसतील, त्यांच्याकडून पचनक्रिया नीट होत नसेल तर मग त्वचेवर त्याचा परिणाम होतो, दम्यासारखे आजार, चयापचय क्रिया मंदावणे यासारख्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. हे टाळण्यासाठी आंब्याच्या हंगामात आंबे खायला हवेत.
- एक सामान्य आकाराच्या आंब्यात आपल्याला दिवसभरात जितक्या क जीवनसत्त्वाची गरज असते त्याच्या दोन तृतियांश क जीवनसत्त्व असतं. आंब्यात अॅण्टिऑक्सिडण्टची विपूलता रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. त्यामुळे वारंवार होणाऱ्या सर्दी पडसं, फ्ल्यू या आजारांना प्रतिबंध होतो.
- आंब्यात बिटा केरोटिन असतं ज्यामूळे शरीराला अ जीवनसत्त्व मिळतं. त्यामूळे डोळ्याचं आरोग्यही सूधारतं. आंब्यात असलेल्या अॅण्टिऑक्सिडण्टसमूळे दृष्टी सुधारते, एकूणच डोळ्याचं आरोग्य सुधारण्यासाठी आंबा महत्त्वाचं काम करतो. वयानुसार डोळ्यात निर्माण होणाऱ्या समस्याही आंब्याच्या सेवनानं कमी होतात.
- आंब्याच्या नियमित सेवनानं शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहाते. यातील पेक्टीन या तंतूमय घटकाच्या विपुलतेमुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी घटते. त्यामुळे रक्तवाहिन्यात गुठळ्या होण्याचा धोका कमी होतो.
- आंब्यात त्वचेच्या आरोग्यास उपयुक्त असे क आणि अ जीवनसत्त्वं मोठ्या प्रमाणावर असल्यानं त्याचा त्वचा निरोगी राहाण्यास आणि दिसण्यास फायदा होतो. प्रमाणात आंबे खाल्ल्यास त्याचा उपयोग त्वचा स्वच्छ होण्यासाठी, त्वचेवरील मृत घटक निघून जाण्यास होतो. त्वचा बरी करणारी पोषक तत्त्वं आंब्यात असल्यानं त्याचा फायदा त्वचेवर दिसतो. आतड्यात त्वचेस हानी पोहोचवणारे विषारी घटक साठून राहिलेले असतात पण आंब्यातीलतंतूमय घटक आतड्यातील हे विषारी घटक बाहेर काढतात आणि त्यामुळे त्वचा देखील स्वच्छ होते.
- आंब्यातील ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो. हा स्तर सरासरी ५१ इतका असतो. ग्लायसेमिक इंडेक्स हा ५५ पेक्षा कमी असेल तर त्याला लो ग्लायसेमिक स्तर म्हटला जातो. या अर्थानं आंब्यतील ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असल्यानं तो रक्तातील साखर एकदम वाढवत नाही. शिवाय आंब्यात तंतूमय घटक असल्यानं ते पचनास मदत करतात ज्याचा परिणाम रक्तातील साखर नियंत्रित राहाण्यास होतो.
- प्रमाणात आंबे खाणं हे वजन कमी करण्यास फायदेशीर असतं. आंब्यातील सालीत असलेले फायटोकेमिकल्स हे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरतात. शिवाय आंब्याच्या सालीत पचनास उपयूक्त तंतूमय घटक असतात. ज्याचा परिणाम पोट भरपूर काळासाठी भरलेलं राहातं. वजन वाढण्यास कारणीभूत ठरणारे इतर स्नॅकस किंवा चटरफटर खाण्याची इच्छा होत नाही आणि वजन आटोक्यात राहातं.