स्वयंपाकघरात आवश्यक गोष्टींपैकी एक महत्वाची गोष्ट म्हणजे दही. साधे, स्पेशल पदार्थ करताना, चटण्या कोशिंबीरीसाठी दही लागतंच. विकतच्या दह्यापेक्षा घरी विरजलेलं दही चविष्ट लागतं. पण अनेकदा घरी लावलेलं दही बिघडतं, कधी ते जास्तच आंबट होतं तर कधी त्यात पाणी जास्त होतं. असं दही टाकून देण्याशिवाय दुसरा पर्याय सूचत नाही. पण बिघडलेलं दही दुरुस्त करण्याच्या, चविष्ट पध्दतीनं पुन्हा वापरण्याच्या युक्त्याही आहेत.
Image: Google
दही बिघडल्यास..
1. दही जर जास्तच आंबट झालं तर थोड्या दुधाच्या सहाय्यानं दह्याची चव सुधरु शकते. यासाठी एका काचेच्या किंवा मातीच्या भांड्यात दही काढावं. दह्याच्या दीड पट कोमट दूध घालावं. यापेक्षा कमी दूध घातल्यास दह्याचा आंबटपणा जात नाही आणि जास्त दूध घातल्यास दही खराब होतं. दह्यात दूध घालून ते रात्रभर तसंच राहू द्यावं. सकाळी दह्याची चव घेतल्यास त्यातला आंबटपणा कमी झालेला लक्षात येईल.
Image: Google
2. दह्यात पाणी जास्त झाल्यास दही वापरण्याजोगं नाही असं मानण्याचं कारण नाही. एका सूती कापड घेऊन दही गाळून घ्यावं. सूती कापडाची दुहेरी घडी करुन यात दही बांधून ठेवल्यास चक्का म्हणजेच ग्रीक योगर्ट तयार होतं. सॅलेडमध्ये हे दही घार्तल्यास उत्तम लागतं.
Image: Google
3. दही खूप आंबट झाल्यास ते टाकून द्यावं लागेल म्हणून चेहरा आंबट करण्याची गरज नाही. असं आंबट दही दूध घालून दुरुस्त करायचं नसल्यास आंबट दह्याचा चविष्ट पध्दतीनं वापर करता येतो. रव्यात हे दही कालवून झटपट इडली करता येते. आंबट दह्याचं मसाला ताक छान लागतं. आंबट दही वापरुन दक्षिण भारतीय दही भात करता येतो. किंवा खाण्यासाठी हे दही वापरायचं नसल्यास हे आंबट दही चेहऱ्यावर लेप लावण्यासाठी वापरता येतं.