मानसिक आरोग्य हे तुमच्या भावनांशी आणि मेंदूशी निगडीत असते हे आपल्याला माहित आहे. याच मानसिक आरोग्याचा तुमच्या आहाराशीही संबंध असतो असे कोणी म्हटले तर आपला विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. हार्वर्ड विद्यापीठातील आहारतज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार काही ठराविक गोष्टी खाल्ल्या तर तुमचे डोके काम करत नाही असे सिद्ध झाले आहे. या पदार्थांतील बॅक्टेरीया तुमच्या शरीराला हानी पोहचवतात आणि त्यामुळे तुमचे डोके काम करत नाही. या अन्नघटकांच्या सेवनामुळे तुम्हाला मेमरी लॉस किंवा मेंदूला सूज येण्याची शक्यता असल्याचे समोर आले आहे. पाहूयात अशा गोष्टी ज्या आपण आहारात घेणे टाळायला हवे.
१. हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड
हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड म्हणजे असे अन्न जे खाल्ल्यानंतर लगेच रक्तवाहिन्यांमध्ये जाते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवते. यामध्ये ब्रेड, पास्ता अशा मैद्याच्या पदार्थांचा समावेश असतो. हे पदार्थ चवीला गोड नसले तरीही त्यांची शरीरात गेल्यावर साखर तयार होते. हे पदार्थ रीफाईंड कार्बमध्ये गणले जातात. त्यामुळे या पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास भविष्यात वजन वाढण्याची, मेटाबॉलिक डिसऑर्डर आणि डायबिटीससारख्या समस्या उद्भवतात. तर जे लोक आहारात धान्ये, सलाड आणि हिरव्या पालेभाज्यांसारख्या कार्बोहायड्रेटसचे प्रमाण चांगले ठेवतात त्यांना अशा स्वरुपाचे त्रास होण्याची शक्यता ३० टक्क्यांनी कमी असते. त्यामुळे जंक फूड टाळलेले केव्हाही चांगले
२. हाय नायट्रेट फूड
हाय नायट्रेट फूडमुळे तुमचे डिप्रेशन वाढते. तसेच शरीरातील चांगल्या बॅक्टेरियांना हानी पोहचवण्याचे काम हे पदार्थ करतात. यामध्ये अन्न टिकवणारे पदार्थ, पदार्थांना रंग येण्यासाठी वापरले जाणारे रंग, वेगवेगळ्या प्रकारचे तयार सॉस तयार करण्यासाठी अशाप्रकारच्या पदार्थांचा वापर केलेला असतो. त्यामुळे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अशाप्रकारच्या पदार्थांपासून दूर राहिलेले केव्हाही चांगले.
३. दारु
दारु आरोग्यासाठी घातक असल्याचे वारंवार सांगितले जाते. मात्र कधी मजा म्हणून तर कधी तणाव कमी करण्यासाठी लोक दारुचे सेवन करताना दिसतात. पण सतत दारुचे सेवन केल्यामुळे मेंदूशी निगडीत समस्या उद्भवतात. अनेकदा या समस्या काही तासांसाठी असतात तर काही वेळा त्या काही दिवसांसाठी असू शकतात. त्यामुळे दारुच्या व्यसनापासून दूर राहिलेले केव्हाही चांगले.
४. तळलेले पदार्थ
तळलेले पदार्थ आरोग्यासाठी घातक असतात. जे लोक जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ खातात त्यांची स्मरणशक्ती दिवसागणिक क्षीण होत जाते. सामोसा, वडा, भजी, कचोरी यांसारखे जंक फूड पदार्थ प्रामुख्याने तळलेले असतात. हे पदार्थ सातत्याने खाल्ल्याने डोक्यात जाणाऱ्या रक्तवाहिन्यांना सूज येते. तसेच सतत तळलेले पदार्थ खाल्ल्याने नैराश्य उद्भवू शकते. त्यामुळे मानसिक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर असे पदार्थ टाळलेलेच बरे
५. साखरयुक्त पदार्थ
जेव्हा आपण साखरयुक्त पदार्थ खातो तेव्हा शरीर त्याचे ग्लुकोजमध्ये रुपांतर करते. त्यामुळे आपण जेव्हा गोड खातो तेव्हा आपल्याला ऊर्जा मिळाल्यासारखे वाटते. पण ही ऊर्जा जास्त प्रमाणात झाल्यास मेंदूचे कामकाज बंद करण्यास ती कारणीभूत ठरते. बेकरी प्रॉडक्ट, चॉकलेटस, मिठाई, आईस्क्रीम, केक, ज्यूस यांसारख्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते जे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. एखादवेळी अशाप्रकारचे गोड पदार्थ खाणे ठिक आहे, पण सातत्याने गोड पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी चांगले नाही.