नावडता भोपळा चविष्ट करुन खाण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यातला एक चविष्ट प्रकार म्हणजे दुधी भोपळ्याची खीर. आइस्क्रीम हे कोणत्याही ¬तुत खायला आवडतं. पण पावसाळा आला की आइस्क्रीम खाण्याची भीती वाटते. इच्छा असूनही आइस्क्रीम खाता येत नाही. पावसाळ्यातली ही आइस्क्रीम खाण्याची हौस भोपळ्याची खीर पूर्ण करते. दुधी भोपळ्याची खीर थंड करुन खाल्ल्यास आइस्क्रीमसारखीच लागते. ही खीर हैद्राबादमधे खूप लोकप्रिय आहे.
दुधी भोपळ्याची खीर करण्यासाठी पाव किलो दुधी भोपळा, एक लिटर दूध, अर्धा कप साखर, पाव कप साबुदाणा, पाव चमचा वेलची पूड, दोन छोटे चमचे चारोळी, एक चिमूट खाण्याचा हिरवा रंग, दोन चमचे काजूची पेस्ट, दोन चमचे बदामाचे काप आणि दोन चमचे गावराण तूप ही सामग्री लागते.
कशी करायची खीर?
सर्वात आधी साबुदाणा एक तास भिजवावा. मध्यम आचेवर दूध गरम करण्यास ठेवावं. दुधाला उकळी फुटली की आच मंद करावी आणि दूध आटेपर्यंत उकळावं. दूध आटत असताना भोपळा आधी छिलून घ्यावा. मग भोपळा किसून घ्यावा. भोपळ्यातला मऊ भाग काढून टाकावा.
एका भांड्यआ दोन चमचे गावराण तूप घेऊन ते गरम करावं. त्यात किसलेला भोपळा टाकून तो पाच मिनिटं परतून घ्यावा. भोपळ्याचा किस नरम झाला की गॅस बंद करावा. दूध आटलं की त्यात भिजवलेला साबुदाणा घालावा. आणि साबुदाणा घातल्यावर दूध आणखी 10 मिनिटं उकळावं. दहा मिनिटानंतर दुधात परतलेला भोपळ्याचा किस टाकावा. आणि आणखी दहा मिनिटं दूध उकळू द्यावं. मधून मधून खीर ढवळत राहावी. शेवटी खीरीमधे वेलची पूड, बदामाचे तुकडे, काजूची पेस्ट चारोळी, फूड कलर, आणि साखर टाकावी. साखर खीरीत विरघळली की गॅस बंद करावा. दोन तीन मिनिटं खीर झाकून ठेवावी. खीर सामान्य तापमानाला आली की ती थंड होण्यासाठी फ्रीजमधे ठेवावी. आणि थंड झाली की आइस्क्रीमसारखी खावी.