श्रावणातल्या सोमवारी अनेकजणांचा उपवास असतो. या उपवासाला हलकं फुलकं खाण्याला महत्त्व असतं. पण तसे पर्याय कमी असल्याने जड पदार्थ खाल्ले जातात. जे पचायला जड असतात ,पौष्टिकही नसतात आणि या पदार्थांनी वजन वाढण्याचा धोकाही असतोच. पण र्शावणी सोमवारच्या उपवासाला मखाने खाणं हा उत्तम पर्याय आहे. मखान्याचे गोड, तिखट, चटपटीत असे विविध प्रकार आहेत. मखाने हे पौष्टिक असले तरी अजूनही ते फारशा लोकांच्या आहारात नसतात. श्रावणी सोमवारच्या उपवासानिमित्त मखान्याच्या पाककृती, मखान्याचे गुणधर्म आणि मखाने खाण्याचे फायदे जाणून घेतल्यास उपवासाला मखान्याला नक्कीच प्राधान्य दिलं जाईल. उपवासाला मखाने सकाळी नाश्त्याला किंवा दुपारच्या खाण्यात किंवा संध्याकाळी भूक लागली, चटपटीत खावंसं वाटलं तर खाता येतात.
मखाना भेळ
छायाचित्र- गुगल
उपवासाच्या दिवशी संध्याकाळच्या आरोग्यदायी स्नॅक्ससाठी मखाना भेळ उत्तम पर्याय आहे. चवीला ही भेळ आंबट, गोड आणि तिखट लागते. ही फक्त चवीलाच चटपटीत आहे असं नाही तर ती पौष्टिक देखील आहे. बटाटे, शेंगदाणे, हिरवी मिरची, मिरपूड् आणि इतर मसालेही या भेळीत वापरले जातात.
मखाना भेळ तयार करण्यासाठी 1 कप रोस्टेड मखाना, अर्धा कप उकडलेले बटाटे, अर्धा कप भाजलेले शेंगदाणे, 1 हिरवी मिरची, 1 चमचा लिंबाचा रस आणि चवीनुसार सैंधव मीठ, दोन छोटे चमचे मिरपूड, 2 चमचे कोथिंबीर आणि 1 चमचा भाजलेले जिरे घ्यावेत.
एका भांडयात उकडलेले बटाटे, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे पूड, मिरे पूड, मीठ आणि लिंबाचा रस हे सर्व साहित्य एकत्र करावं. त्यानंतर यात रोस्टेड मखाना आणि भाजलेले शेंगदाणे घालावेत. पुन्हा सर्व नीट मिसळून घ्यावं. या चिवड्यात थोडे डाळिंबाचे दाणेही घालता येतात.
मखाना चिवडा
छायाचित्र- गुगल
मखान्याचा चिवडा हा देखील उपवासाला चालणारा पौष्टिक पदार्थ आहे. मखान्याचा चिवडा खाल्ल्यास पोट देखील भरपूर वेळ भरलेलं राहातं. शिवाय हा चिवडा करायला खूपच कमी वेळ लागतो. मखान्याच्या चिवड्यात बदाम, काजू, शेंगदाणे, बेदाणे घातल्याने तो पौष्टिक होतो. सोबतच या चिवड्यात मिरे पूड, सैंधव मीठ आणि हिरवी मिरची घातल्यानं हलकासा तिखटपणाही येतो. मखाने आणि इतर सर्व गोष्टी नीट भाजून एकत्र केलं की हा चिवडा तयार होतो. उपवासाला दिवसभरात कधीही भूक लागली तरी खाता येतो.
मखान्याची खीर
छायाचित्र- गुगल
अनेकजण श्रावणी सोमवारच्या उपवासाला तिखट मीठ खात नाही. तेव्हा त्यांनी मखान्याची खीर खावी. मखान्याची खीर करण्यासाठी मखाने, काजू, तूप, वेलची पावडर, दूध, साखर आणि सुकामेवा लागतो. खीर करताना आधी तूपावर मखाने आणि काजू भाजून घ्यावेत. ते थोडे गार झाले की जेवढे मखाने भाजले त्यापैकी पाऊण भाग मखाने आणि काजू हे मिक्सरमधून वाटावेत. दुधाला उकळी आली की हे मिक्सरमधून काढलेले मखाने त्यात घालावेत. ते दुधात नीट मिसळून घ्यावे. थोडे बाजूला ठेवलेले तुपावर परतून घेतलेले मखाने टाकावेत. थोडा वेळ ही खीर उकळू द्यावी. नंतर त्यात साखर घालून ती चांगली हलवून घ्यावी. शेवटी वेलची पावडर टाकावी.
छायाचित्र- गुगल
उपवासाला मखाने खाल्ल्याचे फायदे
1 . उपवासाला अनेकांना गळल्यासारखं होतं. तेव्हा मखान्याचे पदार्थ खाल्ल्यास शरीराला ऊर्जा आणि ताकद मिळते. मखान्यात प्रथिनं, मॅग्नेशियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असल्यानं मखाने खणं आरोग्यास लाभदायक ठरतात.
2. उपवासानंतर बध्दकोष्ठतेचा त्रास होण्याचीही शक्यता खूप असते. पण मखान्यामधे भरपूर प्रमाणात फायबर असतं. पचन नीट होण्यासाठी या फायबरचा खूप उपयोग होतो. म्हणून उपवासाला मखाने खाण्याला महत्त्व आहे.
3. फक्त श्रावणी सोमवारच्या उपवासालाच नाही तर एरवीही मखान्याचे पदार्थ खाणं आरोग्यास फायदेशीर ठरतात. मखान्यात प्रथिनांचं प्रमाण भरपूर असतं आणि कॅलरी मात्र कमी असतात त्यामुळे शरीराला पोषण देण्यासोबतच वजन कमी करण्यासाठीही मखाने उपयुक्त ठरतात.