सकाळच्या नाश्त्याला पिझा हवा असा हट्ट बरीचं मुलं आयांकडे करतात. मुलांची ही मागणी ऐकून आयांच्या कपाळावर आठ्या पडतातच . पिझा कितीही चविष्ट लागत असला तरी सकाळच्या नाश्त्याला कोणी पिझा खातं का? असं म्हणून मुलांची मागणी टोलवली जाते. पण मुलांच्या या मागणीचा सकारात्मक विचार करावा असा चविष्ट आणि हेल्दी पर्याय आहे. विविध भाज्या घालून करता येणारा रव्याचा पिझा करायला सोपा आणि हमखास आवडेल असा प्रकार आहे.
Image: Google
कसा करायचा रव्याचा पिझा?
रव्याचा पिझा करण्यासाठी 4 ब्राऊन ब्रेड स्लाइस, 1 कप रवा, 1 कप दही, 1 कांदा, 1 टमाटा, 1 सिमला मिरची, 10 ऑलिव्ह, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काळी मिरेपूड, 2 मोठे चमचे ताजी साय, गरजेनुसार लो फॅट मोजरेला चीज आणि गरजेनुसार तेल घ्यावं.
Image: Google
रव्याचा पिझा करताना एका मोठ्या भांड्यात रवा, दही आणि साय घेऊन हे सर्व जिन्नस एकजीव करावं. यात मीठ, काळे मिरेपूड घालून मिश्रण नीट मिसळून घ्यावं. नंतर यात बारीक कापलेला टमाटा, कांदा, शिमला मिरची घालून मिश्रण एकत्र करावं. हे मिश्रण घट्टसर असावं, पातळ असू नये. मिश्रण तयार झाल्यावर एका पसरट ताटात ब्राऊन ब्रेड स्लाइस घ्याव्यात. सर्व ब्रेडला तयार केलेलं रव्याचं मिश्रण नीट पसरवून लावावं. प्रत्येक ब्रेड स्लाइसला रव्याचं मिश्रण लावून झाल्यावर ब्रेडवर 1- 2 चमचे मोजरेला चीज किसून घालावं. नंतर ऑलिव्हचे तुकडे ठेवावेत. हे तुकडे हलक्या हातानं दाबावेत.
Image: Google
नाॅन स्टिक तवा गरम करावा. तव्याला थोडं तेल लावावं. ब्रेडची रव्याचं मिश्रण लावलेली बाजू तव्यावर शेकायला ठेवावी. ती बाजू शेकून झाली की ब्रेड दुसऱ्या बाजूनेही सोनेरी रंगावर शेकून घ्यावं. हा रव्याचा पिझा टमाट्याच्या साॅससोबत किंवा पुदिन्याच्या हिरव्या चटणीसोबत छान लागतो.