एकदा खाल्लं तर संध्याकाळी काहीतरी चटकदार, खमंग चवीचं खाण्याची लहर येते. पण चटकदार खाण्याच्या नादात चुकीचं खाल्लं जातं आणि त्याचा पोटावर आणि वजनावर विपरित परिणाम होतो. चटपटीत आणि चटकदार खाण्याची हौस पौष्टिक पदार्थांच्या माध्यमातूनही पूर्ण करता येते. कॉर्न चाट हा असाच चटकदार आणि पौष्टिक पदार्थ आहे. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठीचा चविष्ट पर्याय.
मुळात हा कॉर्न चाट उत्तर भारतीय प्रकार आहे. तिथे तो आवडीनं खाल्ला जातो. कॉर्न चाट करण्यासाठी स्वीट कॉर्न लागतात. जे हल्ली बाराही महिने मिळतात. पण पावसाळ्याच्या दिवसात मका खाण्याची मजाच वेगळी असते. उकडलेला मका, त्यात कच्च्या भाज्या, लिंबू आणि टमाट्याचा आंबटपणा, मिरचीचा आणि आल्याच्या रसाचा झणझणीतपणा आणि चटपटीत मसाले यामुळे हा कॉर्न चाट कोणाला आवडणार नाही असं शक्यच होणार नाही.
चटपटीत कॉर्न चाट तयार करण्यासाठी एक किलो उकडलेले स्वीट कॉर्न, दोन हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा भाजलेल्या जिर्याची पावडर, चवीनुसार मीठ, दोन पिवळ्या सिमला मिरची, दोन चमचा आल्याचा रस, दोन चमचे लिंबाचा रस, कोथिंबिर, अर्धा चमचा मिरे पावडर, एक चमचा सैंधव मीठ, एक कप टमाटा, एक कप हिरवी शिमला मिरची, एक कांदा हे जिन्नस लागतं.
छायाचित्र- गुगल
कॉर्न चाट कसं तयार करणार?
कॉर्न चाट तयार करण्यासाठी सिमला मिरची, टमटा, कांदा ही सर्व सामग्री बारीक कापून ती बाजूला ठेवावी. नंतर एका भांड्यात मीठ, सैंधव मीठ, जीरे पावडर, मिरे पावडर, लाल तिखट हे सर्व मसाले एकत्र करुन घ्यावेत.
एका कढईत तेल टाकावं. ते गरम करावं. त्यात उकडलेले स्वीट कॉर्नचे दाणे टाकावेत. सात आठ मिनिटं ते चांगले परतून घ्यावेत. मक्याचे दाणे सोनेरी रंगावर परतले गेले की गॅस बंद करावा. नंतर यात सर्व कापलेल्या भाज्या घालाव्यात. एकत्र केलेले मसाले टाकून ते सगळं छान मिसळून घ्यावं. मग यावर आल्याचा रस आणि लिंबाचा रस घालून ते पुन्हा चांगलं एकत्र केलं की कॉर्न चाट तयार होतो.
छायाचित्र- गुगल
मक्यामधे खनिजं, अँण्टिऑक्सिडण्ट, अ, ब आणि ई जीवनसत्त्वं यासारखी पोषण मूल्यं असतात. तसेच कॉर्न चाट करताना त्यात घातलेल्या भाज्यांमुळे त्याची पौष्टिकता आणखीनच वाढते.