आपण विकत सामोसा, कचोरी किंवा ढोकळा आणला की त्यासोबत एक तिखट आणि एक चिंचेची आंबट गोड चटणी हमखास मिळते. मात्र ही चटणी खाऊन पोटाला त्रास होण्याची शक्यता असते. ती किती जुनी आहे, त्यासाठी कोणतं पाणी वापरलं आहे, ती स्वच्छ जागी केली आहे की नाही असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला पडतात. भेळ, पाणीपुरी किंवा शेवपुरी असे चाटमधील काही पदार्थ करायचे असतील तरी आपण ही चिंचेची चटणी विकत आणतो. पण ही चिंचेची चटणी अतिशय सोपी असून आपण ती घरच्या घरी सहज करु शकतो. कमीत कमी पदार्थात अगदी झटपट होणारी ही चटणी नेमकी कशी करायची पाहूया (Imli Chutney Tamarind Chutney Recipe)..
साहित्य -
१. चिंच - अर्धी वाटी
२. गूळ - १ वाटी
३. काळं मीठ - चवीनुसार
४. तिखट - अर्धा चमचा
५. जीरे पूड - पाव चमचा
६. खजूर - ५ ते ६ बिया
कृती -
१. चिंच कोमट पाण्यात अर्धा तास भिजत घालायची.
२. नंतर हाताने या चिंचेचा कोळ काढायचा आणि तो गाळून घ्यायचा
३. खजूर पाण्यात भिजवून ते मिक्सरवर फिरवून घ्यायचे.
४. गूळ पाण्यात भिजवायचा आणि त्याचे घट्टसर पाणी करायचे.
५. मग चिंचेचा कोळ, गूळाचे पाणी आणि खजूराची पेस्ट सगळे एकत्र करायचे.
६. यामध्ये मीठ, तिखट आणि जीरे पूड घालायची.
७. चिंचेची आंबट गोड चटणी चाट, वडे, पराठा अशी कशासोबतही चांगली लागते.
८. ही चटणी घट्टसर करायची असेल तर यात दाणे, तीळ यांचा कूट घातला तरी डोसा, पोळी यांच्यासोबत छान लागते.