चहा म्हणजे दुधाचाच हवा. दुधाशिवाय चहाची कल्पनाही करवत नाही. भलेही ब्लॅक टी, ग्रीन टी, हर्बल टी हे बिना दुधाच्या चहाचे औषधी प्रकार आरोग्यासाठी कितीही लाभदायक असले तरी दिवसाची सुरुवात दुधाच्या चहानेच करण्याची सवय अनेकांना आहे. स्पेशल दुधाचा चहा, बासुंदी चहा हे चहाचे प्रकार तर एकदम खास आणि चवीचवीने पिण्याचे आहे. असं असलं तरी गायीच्या किंवा म्हशीच्या दुधाच्या चहाचे आरोग्यावर होणार्या वाईट परिणामांबद्दल आता बोललं जात आहे. तसेच वेगन आहार पध्दती अवलंबण्याचा ट्रेण्डही सध्या सुरु आहे.
Image: Google
क्रिकेटपटू, प्रसिध्द अभिनेता-अभिनेत्री यांच्यामुळे वेगन आहार पध्दती स्वीकारणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा लोकांमधे दुधाचाच चहा आवडणारेही खूप आहे. वेगन होणं ही चांगली गोष्ट पण दुधाच्या चहाशिवाय ना तोंडाला चव येते ना कामाला किक बसते अशी तक्रार वेगन आहरशैली अवलंबलेल्या अनेकांची आहे. या तक्रारीवर उपाय म्हणजे ‘वेगन मसाला चहा’. हा चहा वेगन असला तरी तो दुधाच्या चहाच्या चवीचा अभाव अजिबात जाणवू देत नाही.
वेगन मसाला चहाची क्रेझ सध्या वाढते आहे. त्याची चवही लोकांना आवडते आहे. दुधाच्या चहाशी तुलना करता हा चहा कुठेही कमी पडत नाही. उलट या वेगन मसाला चहाचे स्वत:चे असे खास वैशिष्ट्यं आहेत.
Image: Google
वेगन मसाला चहा.. यात विशेष काय आहे?
वेगन मसाला चहा हा गाय, म्हैस, बकरी या प्राण्यांच्या कोणत्याही दुधापासून बनत नसला तरी वेगन मसाला चहाची चव दुधाच्या चहासारखीच लागते हे या चहाचं खास वैशिष्ट्य. वेगन मसाला चहात प्राण्यांचं दूध न वापरता बदामाचं, सोयाबिनचं, ओटस किंवा नारळाचं दूध वापरलं जातं.
वेगन मसाला चहा दुधाच्या चहाची कमतरता भासू देत नसला तरी दुधाच्या चहाच्या तुलनेत या चहाचा रंग थोडा फिका असतो. तसेच हा चहा नेहेमीच्या दुधाच्या चहापेक्षा थोडा पातळ असतो. पण चवीच्या बाबतीत हा दुधाच्या चहा इतकाच किंबहुना त्याहूनही चवदार असतो असं वेगन चहा पिणार्यांचं मत आहे.
कसा करतात वेगन चहा?
वेगन मसाला चहा करताना एक कप चहाच्या हिशोबानं म्हणायचं झाल्यास 1 कप पाणी, दीड चमचा साखर किंवा गूळ, 2 छोटे चमचे चहा पावडर, अर्धा चमचा चहा मसाला ( मिरे, वेलची, जायफळ, दालचिनी , लवंग यापासून तयार केलेला पूड स्वरुप मसाला) , अर्धा चमचा किसलेलं आलं, दीड ते दोन कप बदामाचं दूध/ सोयाबिन दूध/ नारळाचं दूध/ ओटसचं दूध एवढी सामग्री घ्यावी.
Image: Google
आपण नेहेमीचा दूध घातलेला मसाला चहा करतो त्याप्रमाणेच वेगन दुधाचा चहा करायचा असतो. फक्त हा चहा करताना आपण चहात वेगन दूध कसं घालणार हा मुद्दा महत्त्वाचा असतो. वनस्पतींवर आधारित घटकांपासून जेव्हा दूध तयार केलं जातं तेव्हा ते गरम गोष्टीत वापरताना फाटण्याची शक्यता असते. असं होवू नये यासाठी दूध उकळलेल्या चहात थेट टाकण्याआधी हे दूध आधी थोड्या गार पाण्यात मिसळून घ्यावे आणि नंतर उकळलेल्या चहात ते घालावं. दूध घातल्यानंतर मंद आचेवर चहा सहा ते सात मिनिटं उकळावा आणि मग गाळून प्यावा.