हिवाळ्यात आपली भूक खवळते. या दिवसात काहीतरी चमचमीत, झणझणीत खाण्याची इच्छा ही होतेच. हिवाळ्यात हिरव्या भाज्या बऱ्याच प्रमाणात मिळतात. मात्र, तीच तीच भाजी खाऊन खूप कंटाळा येतो. बऱ्याचदा घरात भाजी उपलब्ध नसते. भाजी नसल्यावर भाकरी अथवा चपातीसोबत काय खावे असा प्रश्न पडतो. भाजी शिजायला वेळ लागतो, त्यामुळे महाराष्ट्रीयन पद्धतीने डांगर ही रेसिपी आपण करू शकता. ही रेसिपी खूप पौष्टीक आणि हेल्दी आहे. ही रेसिपी उडीद डाळीपासून बनवले जाते.
उडीद डाळ हे एक पौष्टीक धान्य आहे. उडीद या डाळीमध्ये खूप प्रमाणात प्रथिने आढळते, यासह पोटॅशियम आणि कॅल्शियम आपल्या शरीराला उर्जा देतात. ज्यामुळे ही डाळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली गेली आहे. गावाकडे काही भाजी नसल्यास अथवा माळ - रानात जेवायला जायचे असेल तर, उडदाच्या डाळीपासून डांगर बनवतात. यासह भाकरी, ठेचा व कांदा खातात. हा अनुभव आपण घरात देखील घेऊ शकता. चला तर मग या झणझणीत पदार्थाची कृती पाहूयात.
डांगर बनवण्यासाठी लागणारं साहित्य
काळी उडीद डाळ
पाणी
हिरव्या मिरचीचा ठेचा
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेली कोथिंबीर
मीठ
तूप अथवा तेल
कढीपत्ता
जिरं
मोहरी
हळद
कृती
सर्वप्रथम, एका गरम लोखंडी तव्यात काळे उडीद डाळ चांगले भाजून घ्या. डाळ चांगले भाजून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाका, डाळ थंड झाल्यानंतर चांगले वाटून घ्या. ही डाळ पावडरप्रमाणे वाटून घ्यायची आहे. डाळ वाटून झाल्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या.
त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाका, व हे मिश्रण चांगले मिक्स करा. मिश्रण घट्ट अथवा जास्त पातळ ठेवायचे नाही आहे. हे मिश्रण मध्यम घट्ट ठेवायचे आहे. मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ टाकून मिश्रण पुन्हा मिक्स करा.
दुसरीकडे एका फोडणीच्या भांड्यात तूप अथवा तेल टाका. त्यात कढीपत्ता, जिरं, मोहरी, हळद टाकून तेलात हे मिश्रण मिक्स करा. व तयार डांगरवर ही फोडणी द्या. फोडणी दिल्यानंतर हे मिश्रण पुन्हा मिक्स करा. अशा प्रकारे झणझणीत गावरान डांगर खाण्यासाठी तयार. आपण हा पदार्थ भाकरी, ठेचा आणि कांदासोबत खाऊ शकता.