उन्हामुळे शरीराची लाहलाही झालेली असताना आपण सगळेच जेवणात काही ना काही गार घ्यायचा प्रयत्न करत असतो. यामध्ये प्रामुख्याने दही, ताक यांचा समावेश असतो. दही कधी खावे, कसे खावे, कोणत्या पदार्थांबरोबर खावे अशा बऱ्याच गोष्टी आहारशास्त्रात आणि आयुर्वेदात नेहमी सांगितल्या जातात. दह्यामध्ये दह्यात प्रोटीन, कॅल्शियम, व्हीटॅमिन बी ६, बी १२ जास्त प्रमाणात असल्याने दही आणि ताक या दोन्हीचा आहारात समावेश असायलाच हवा असे नेहमी सांगितले जाते. मात्र दही खाताना त्यामध्ये साखर, मध किंवा तूप घालून खावे म्हणजे ते पचायला सोपे होते असे आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात.
आहारात मधाचा समावेश असणेही अतिशय फायदेशीर असते. नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या मधामध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज असतात. याशिवाय त्यामध्ये विविध जीवनसत्वे, झिंक, मँगनिज, कॅल्शियम, लोह यांसारखी खनिजे आणि अँटीऑक्सिडंटस असल्याने मधाचा आहारात समावेश असणे अतिशय फायदेशीर मानले जाते. त्यामुळे मध आणि दही एकत्र खाल्ल्यास त्याचे आरोग्याच्या विविध तक्रारींवर उपाय म्हणून त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. फॅट टू स्लिमच्या डायरेक्टर न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन शिखा अग्रवाल शर्मा यांनी दही व मध एकत्र खाण्याचे फायदे सांगितले आहेत. पाहूयात दह्यात मध घालून खाण्याचे फायदे...
१. दह्यामध्ये प्रथिने भरपूर असतात आणि मधामध्ये ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते, ग्लुकोज हा कार्बोहायड्रेटचा एक प्रकार आहे. जे लोक व्यायाम करतात त्यांना ऊर्जा मिळण्यासाठी आणि स्नायूंच्या बळकटीसाठी या दोन्हीची आवश्यकता असते. त्यामुळे व्यायाम करणाऱ्यांनी व्यायामानंतर मध आणि दही आवर्जून खायला हवे.
२. दह्यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. ही दोन्ही पोषकतत्त्वे हाडांच्या मजबूतीसाठी अतिशय आवश्यक असतात. जर तुम्हाला वारंवार थकवा, अशक्तपणा आणि हाडांमध्ये वेदनांचा त्रास जाणवत असेल तर तुम्ही या मिश्रणाचे सेवन करावे. याचा हाडांच्या मजबूतीसाठी नक्कीच फायदा होतो.
३. पोट खराब होणे आणि पचनाच्या तक्रारी उद्भवणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. अनेकांना ब्लोटिंग, गॅस, अपचन आणि ऍसिडीटी यांसारख्या तक्रारी उद्भवतात. अशावेळ नियमितपणे मध आणि दही खाल्ल्यास निश्चितच आराम मिळू शकतो.
४. विविध आजारांचा सामना करण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती चांगली असणे अतिशय आवश्यक असते. दही आणि मधामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ आढळते, जे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास उपयुक्त असते. त्यामुळे सध्या साथीचे आजार वेगाने पसरत असताना हे मिश्रण दुपारच्या जेवणात घ्यायला हरकत नाही.
याशिवायही लठ्ठपणा, हृदयरोग, संधिवात यांसारख्या तक्रारींवर हे मिश्रण एक उत्तम उपाय ठरु शकते.