Join us  

या थंडीत ट्राय करा गरमागरम फणसाची भजी, पौष्टीकतेने भरपूर, चवीलाही उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2022 1:27 PM

Raw Jackfruit Fritters Winter Special Recipe कच्च्या फणसाची भाजी आणि चिप्स खाऊन पाहिलात आता भजी ट्राय करा, बनवायला सोपी, झटपट आणि पौष्टीक

आपल्या सर्वांचाच आवडतं फळ म्हणजे फणस. फणस खाताना जरी चिकट लागत असलं तरी देखील खायला खूप गोड आणि चविष्ट लागतो. बरेच लोकं कच्च्या फणसाची भाजी अथवा चिप्स तयार करतात. जे लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात. आज आपण फणसाची कुरकुरीत भजी कशी तयार करायची हे पाहूयात. फणसात फायबर, विटामिन ए, सी, थायमिन, पोटैशियम, कॅल्शियम, इबोफ्लेविन, आयरन, नियासिन, आणि झिंक असे भरपूर पौष्टिक तत्वे आहेत. जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत. भाजी आणि चिप्स तर आपण खाल्लीच असेल पण आता कच्च्या फणसाची भजी ट्राय करा. थंडीच्या या ऋतूत ही क्रिस्पी रेसिपी सगळ्यांना आवडेल. अतिशय सोपी झटपट आणि चवीला देखील खूप चविष्ट लागते. पाहूया ही भजी कशी बनवायची.

फणसाची भजी करण्यासाठी लागणारं साहित्य

कच्च्या फणसाचे फोड - ५०० ग्राम 

मीठ - चवीनुसार

हिंग

बेसन - १ कप 

तांदळाचं पीठ - अर्धा कप 

हिरवी मिरची - बारीक चिरून घेतलेले २ 

लाल तिखट - १ टेबलस्पून 

धणे पावडर - अर्धा टेबलस्पून

आमचूर पावडर - अर्धा टेबलस्पून 

गरम मसाला - अर्धा टेबलस्पून 

तेल 

कृती

सर्वप्रथम फणसाचे बिया काढून लांब काप करून घ्या. एका कुकरमध्ये अर्धा कप पाणी टाका, अर्धा छोटा चमचा मीठ, अर्धा छोटा चमचा हिंग, त्यात फणसाचे काप टाकावे. झाकण बंद करून १ शिट्टी येऊ द्यावी. शिट्टी झाल्यानंतर फणसाचे काप एका बाउलमध्ये काढून घ्यावे. दुसऱ्या बाउलमध्ये एक कप बेसन, अर्धा कप तांदळाचा पीठ, चवीनुसार मीठ, थोडे पाणी टाकून पीठ तयार करावे. आता त्यात हिरवी मिरची, लाल तिखट, धणे पावडर, आमचूर पावडर, गरम मसाला, आणि एक चमचा गरम तेल टाकून पीठ तयार करून घ्या. आता त्यात उकडून घेतेलेले फणसाचे काप टाकावे. आणि एक छोटा चमचा हळद टाकून मिश्रण एकजीव करून घ्यावे.

एका मोठ्या कढईत तेल गरम करावे. तेल गरम झाल्यानंतर त्यात चमच्याने तयार झालेलं मिश्रण हळू टाकावे. ज्या प्रकारे आपण इतर भजी तळून घेतो. त्याचप्रमाणे भजी तळून घ्या. ब्राऊन रंग येऊ पर्यंत मंद आचेवर भजी चांगले तळून घ्या. भजी तळून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये टिश्यू ठेवून त्यात भजी काढून घ्या. जेणेकरून अतिरिक्त तेल टिश्यू शोषून घेईल. अशा प्रकारे फणसाच्या कुरकुरीत भजी तयार आहेत. आपण ही भजी टाॅमेटो साॅस अथवा हिरव्या चटणीसह खाऊ शकता.      

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.