बॉलिवूड अभिनेत्री आपला फिटनेस आणि सौंदर्य टिकवण्यासाठी आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करत असतात. त्यामुळेच त्यांची त्वचा इतकी ग्लोइंग असते. आलिया भट ही क्यूट अभिनेत्री आपल्या सौंदर्यासाठी नेहमी उत्तम घरगुती आहार आणि घरगुती उपाय करणे पसंत करते. अनेकदा ती योगा करतानाचे व्हिडियो आणि पोस्टही आपण पाहिल्या असतील. आलियाला बीट खुप आवडत असून ती रोजच्या आहारात बीट खात असल्याचे तिने एकदा सांगितले होते. बीटाचे आरोग्यासाठी असणारे फायदे आपल्याला माहित असतात. त्यामुळे जंक फूड खाण्याला चांगला पर्याय द्यायचा असेल तर लहान मुलांना आणि मोठ्यांनाही आवडतील अशा बीटाच्या सोप्या, आणि झटपट होणाऱ्या रेसिपी पाहूयात....
बीट रेसिपी
१. थालिपीठ - थालिपीठ म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर भाजणीचे खमंग थालिपीठ येते. पण याशिवायही वेगवेगळ्या भाज्या घालून थालिपीठ करता येऊ शकते. किसलेले बीट, कांदा, कोथिंबीर घातलेले थालिपीठ चवीला अतिशय मस्त लागते. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गहू, ज्वारी, बाजरी, बेसन ही पीठे एकत्र करु शकता. यामध्ये धने-जीरे पावडर, तिखट, मीठ, कांदा, कोथिंबीर घातले की गरमागरम थालिपीठ तूप, लोणी किंवा लोणच्यासोबत मस्त लागते. बीटाचा रंग आकर्षक असल्याने लहान मुलांनाही हे थालिपीठ खायला वेगळे वाटते. एरवी बीट पाहून नाक मुरडणाऱ्यांसाठी हा एक उत्तम उपाय आहे.
२. बीट कटलेट - थंडीच्या दिवसांत बाजारात अनेक भाज्या उपलब्ध असतात. यातही बीट, गाजर, मटार, फरसबी, बटाटा, कांदा अशा भाज्या अगदी सहज मिळतात. बीट आणि गाजर उकडून किसून घ्यावे. त्यात उकडलेले मटार, फरसबी आणि बटाटा स्मॅश करुन घालावे. कांदा आवडीप्रमाणे उभा चिरुन घालावा. सगळे एकत्र करुन त्यात आलं मिरची लसूण पेस्ट घालावी. मीठ आणि धनेजीरे पावडर, लिंबू घालावे. चवीसाठी मीठ आणि थोडीशी साखर घालावी. हे मिश्रण चिकट झाले असे वाटल्यास त्यात ब्रेडचा चुरा करुन घालावा. याचे हातावर गोल कटलेट थापून ते रव्यात घोळून शॅलो फ्राय करावेत. हे कटलेट नुसते चटणी किंवा सॉससोबत चांगले लागतातच पण पोळी किंवा ब्रेडमध्ये घालूनही तुम्ही ते खाऊ शकता.
३. बीट हलवा - घरी कोणी पाहुणे येणार म्हटले किंवा कुटुंबातील कोणाचा वाढदिवस असेल तर घरच्या घरी गोड काय करावे असा प्रश्न आपल्यासमोर असतो. सतत शिरा, खीर करुन कंटाळा आला असेल तर गाजर हलवा किंवा बीट हलवा हा उत्तम पर्याय असू शकतो. गाजर हलवा आपण सगळे नेहमीच करतो. पण त्याच पद्धतीने बीटाचा हलवा केल्यास जेवणाची रंगत तर वाढतेच पण उत्तम आरोग्यासाठीही हा पदार्थ अतिशय चांगला पर्याय ठरु शकतो. तूपात खवा आणि उकडून किसलेले बीट घाला. त्यात तुमच्या आवडीनुसार साखर घाला. शेवटी सुकामेवा आणि वेलची पावडर घालून एकजीव करा. चांगली वाफ आल्यानंतर गॅस बंद करा. बीट मूळातच गोड असल्याने याला साखर थोडी कमी असले तरी चालते. हा आगळावेगळा आणि हेल्दी पदार्थ केल्यास सगळ्यांमध्ये तुमचे नक्की कौतुक होईल हे नक्की.
बीट खाण्याचे फायदे
१. बीटामध्ये लोह, व्हिटॅमिन ए, बी ६ आणि भरपूर अँटीऑक्सिडंटस असतात. तसेच बिटातील इतर घटकांमुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर फेकण्याचे काम केले जाते.
२. नियमित बीट खाल्ल्याने लिव्हरला सूज येण्याचा धोका टळला जातो.
३. बीटातील नायट्रेट या घटकामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
४. बीटात कॅलरीज आणि फॅटसचे प्रमाण कमी असते त्यामुळे सामान्यपणे बीट प्रत्येकाला चालते.
५. तुम्ही दिवसभर कामे करुन थकत असाल तर स्टॅमिना टिकवण्याच्या दृष्टीने बीट अतिशय उपयुक्त ठरते.
६. अनेकदा शरीरातील पोटॅशियमची पातळी कमी झाली की क्रॅम्प येणे, चक्कर येणे, थकवा येणे असे प्रकार होतात. मात्र अशावेळी बीटाचा आहारात समावेश करावा. यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचा आरोग्याला चांगला फायदा होतो.
७. महिलांमध्ये सामान्यपणे हिमोग्लोबिन आणि लोहाची कमतरता आढळते. मात्र बीटाच्या नियमित सेवनाने ही समस्या दूर होण्यास मदत होते.
८. मासिक पाळी नियमित येत नसेल तर बीट खाल्ल्याने ही अडचण दूर होण्यास मदत होते.
९. बीटात असणारे फॉलिक अॅसिड गर्भवती महिला आणि गर्भ या दोघांसाठी फायदेशीर असते.
१०. रक्त वाढण्यासाठी बीट चांगले काम करते. बीटामुळे अॅनिमियाची समस्या दूर होते. त्यामुळे बीटाचे काप, रस, कटलेट, कोशिंबिर अशा वेगवेगळ्या स्वरुपात बीट खायला हवे.
११. बीट आरोग्यासाठी फायदेशीर आहे त्याचप्रमाणे त्वचेचे आणि केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठीही बीटाचा उपयोग होतो.
१२. बीटातील सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, सल्फर, क्लोरीन, आयोडीन,लोह, व्हिटॅमिन बी आणि सी यांमुळे ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांची सांधेदुखी दूर होण्यास मदत होते.