भाजी आमटी चविष्ट करण्यासाठी नेहेमीच्या तिखट, गरम मसाला, धने पावडर यासोबतच आणखी एखाद्या स्पेशल मसाल्याच्या शोधात आपण नेहमीच असतो. त्यासाठी वेगवेगळ्या ब्रॅण्डचे सब्जी मसाले वापरुन पाहिले जातात पण चवीत म्हणावा तसा फरक पडत नाही. यासाठी घरी तयार केलेला पाॅवरफुल मसालाच हवा. दुकानात भाज्यांचा स्वाद वाढवण्यासाठी किचन किंग मसाला (kitchen king masala) म्हणून जो मसाला विकला जातो तोच जर घरी केला तर जास्त चविष्ट होतो. अगदी थोडा टाकला तरी भाजी आमटीला स्पेशल चव येते. रोज फार काही न करता भाजी आमटीला जर विशेष स्वाद (increase taste of sabji and curry) आणायचा असेल तर एखाद्या दिवशी सवड काढून किचन किंग मसाला (how to make kitchen king masala at home) करायलाच हवा. किचन किंग मसाल्यात 16 ते 17 प्रकारचे मसाल्याचे जिन्नस वापरले जातात. किचन किंग मसाला घरी तयार करण्यासाठी मसाल्याचं जे जिन्नस घेतलं जाईल ते ताजं असायला हवं.
Image: Google
कसा करायचा किचन किंग मसाला?
किचन किंग मसाला करण्यासाठी 1 मोठा चमचा जिरे, 1 चमचा शहा जिरे, 1 चमचा धने, 1 चमचे मोहरी डाळ, अर्धा चमचा मेथ्या, 1 छोटा चमचा बडिशेप, 1 मोठा चमचा हरभरा डाळ, 12-15 काळे मिरे, 8-10 लवंगा, अर्धा चमचा जायपत्री, 6 हिरवी वेलची, 4 मोठी वेलची, 2-3 दालचिनीचे तुकडे, 3 चक्रफुल, 6-7 सुक्या लाल मिरच्या, 1 छोटा चमचा जायफळ पावडर, 1 छोटा चमचा हळद, 1 चमचा सूंठ पावडर आणि 1 चमचा सैंधव मीठ घ्यावं.
Image: Google
किचन किंग मसाला करताना कढई घ्यावी. कढई चांगली गरम झाली की आधी सुक्या लाल मिरच्या 3-4 मिनिटं मंद आचेवर भाजाव्यात. मिरच्या भाजल्या गेल्या की त्या वेगळ्या ठेवाव्यात. मग कढईत हरभरा डाळ मंद आचेवर सोनेरी रंगावर भाजून घ्यावी आणि ती वेगळी काढून ठेवावी. नंतर कढईत जिरे, शहा जिरे, बडिशेप, धणे, मेथ्या, मोहरीची डाळ मंद आचेवर मस्त वास सुटेपर्यंत भाजावेत. हे जिन्नस भाजलं गेलं की ते लाल सुक्या मिरच्यात एकत्र करुन ठेवावं. नंतर कढईत दालचिनी, लवंग, काळे मिरे, बडिशेप, हिरवी वेलची, मोठी वेलची आणि जायपत्री मंद आचेवर वास सुटेपर्यंत भाजून घ्यावी. भाजल्या गेल्यानंतर हे जिन्नस वेगळं ठेवावं. भाजलेली मसाल्याची सामग्री गार होवू द्यावी. नंतर मिक्सरमधून हे सर्व कोरडे भाजलेले मसाले एकत्र करुन वाटून घ्यावेत. वाटलेला मसाला काढून घेऊन त्यात हळद, सूंठ पावडर आणि सैंधव मीठ घालाव. ते चांगलं मिसळून पुन्हा मिक्सरमधून ते एकदा फिरवून घेतलं की किचन किंग मसाला तयार होतो.
किचन किंग मसाला तयार झाला की, तो हवाबंद डब्यात भरुन ठेवावा. हा मसाला महिनाभर छान राहातो. त्याचा स्वाद उडत नाही. जर मसाला महिनाभरात वापरला जाणार नसेल तर जितका लागतो तितका मसाला मिसळणीच्या डब्यात काढून बाकीचा मसाला हवाबंद डब्यात भरुन फ्रिजमध्ये ठेवावा. अशा पध्दतीनं फ्रिजमध्ये ठेवलेला मसाला वर्षभरही रंग,स्वादासह छान टिकतो.