Join us  

रोजच्या जेवणात आमसूलाचा वापर वाढवा, पदार्थही चविष्ट; आरोग्याचे ८ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 1:06 PM

जेवणाचा स्वाद तर वाढेलच पण तब्येतही राहील ठणठणीत

ठळक मुद्देतोंडाला चव येण्याबरोबरच आरोग्यासाठीही उपयुक्त आमसूल खायला हवेआमसूलाने वाढवा जेवणाची लज्जत

पदार्थांची लज्जत वाढवण्यासाठी भारतीय जेवणात एकाहून एक घटक  उपलब्ध असतात. चिंच, आमसूल (Kokam) हे त्यापैकीच एक. पदार्थाला आंबट चव येण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आमसूलाने जेवणाचा स्वाद तर वाढतोच, पण आरोग्यासाठीही त्याचे बरेच फायदे असतात. साधारणपणे कोकण किनारपट्टीत पिकणाऱ्या आमसूलाला कोकम, रतांबी, भिरंड, बिरुंड अशा अनेक नावांनी ओळखले जाते. आपल्याकडे आमसूलाचे सार, सरबत, चटणी, भाजी किंवा आमटीला चव आणण्यासाठी आमसूल वापरणे असा आमसूलाचा वापर केला जातो. कोकमच्या बियांपासून तेल निघते त्याला कोकम तेल किंवा भिरंडेल म्हणतात. या तेलाचेही बरेच फायदे आहेत. आहारात आमसूल खाण्याचे फायदे सांगत आहेत आयुर्वेदतज्ज्ञ डॉ.संजुक्ता देशमुख चव्हाण.

१. ताजी फळे हृदयासाठी हितकारक ठरतात, तसेच ती शरीरातील रक्त व पित्ताला देखील फायदेशीर ठरतात. तर सुकलेले आमसूल जेवणाला रुची निर्माण करणारे आहे, त्यामुळे पचनासाठी लागणाऱ्या विविध पाचक रसांचा स्त्राव चांगल्या पद्धतीने घडून येतो आणि त्यामुळे आपली पचनशक्ती वाढते.

२. हृद्यासंबंधी असणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी आमसूल गुणकारी आहे. यामध्ये असणाऱ्या पोटॅशियममूळे हृद्यासंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते. हृदयाचे कार्य उत्तम राहावे व हृदय निरोगी ठेवण्यासाठी  आमसूल योग्य मात्रेत नियमितपणे खाणे फायदेशीर ठरते.

३. आमसूल मध्ये  व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन इ असल्याने दृष्टीसाठी लाभदायक असते.

४. बऱ्याचदा हिवाळ्यात त्वचेला, तळहात, तळपायाला भेगा पडतात किंवा काही व्यक्तींमध्ये उष्णता व रुक्षता वाढून देखील तळहात तळपायाला भेगा पडतात. अशावेळी कोकमच्या बियांपासून काढलेल्या कोकम तेलाचा किंवा त्या तेलापासून बनवलेल्या मलमाचा अतिशय चांगला फायदा होतो. तसेच हाता- पायांची जळजळ कमी होण्यासही याचा उपयोग होतो. 

५. आंगावर शीतपित्त किंवा पितांब उठल्यास आमसुले ठेचून त्याचा रस अंगाला लावतात. त्यामुळे पित्तामुळे आलेल्या गांधी जाण्यास मदत होते. 

६. जुलाब, पोटाच्या तक्रारींवर आमसूल अतिशय उपयुक्त असते. रक्त आणि आव शौचावाटे पडत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने आमसूल सरबत घेणे फायद्याचे ठरते.

७. वजन कमी करायचे असलेल्यांसाठी आमसूल उपयोगी ठरू शकते. आमसूलामध्ये असणाऱ्या अँटी ऑक्सिडंटमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यामुळे वजन आपोआप कमी होते. 

८.    ग्रीष्म ऋतू (उन्हाळा) किंवा शरद ऋतूमध्ये शरीरातील उष्णता कमी करणे, सतत लागणारी तहान शमवणे आणि शरीरातील घाम बाहेर जाऊन आलेला थकवा दूर करण्यासाठी आंबट गोड असे मनाला आल्हाद देणारे कोकम सरबत गुणकारी ठरते. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.