Join us  

स्वातंत्र्यदिनानिमित्त काय स्पेशल बेत? करा तिरंगी शिरा आणि तीन रंगाचं सरबत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 2:24 PM

रव्याचा तिरंगी शिरा आणि तिरंगी सरबत. या दोन्ही गोष्टी बनवणं सोपं आहे. शिवाय त्या बनवताना, त्याचा आनंद घेताना स्वातंत्र्यदिन आपण स्पेशल रितीनं साजरा केल्याचे समाधानही मिळेल.

ठळक मुद्देतिरंगी शिर्‍याची आगळी वेगळी चव अनुभवता येण्यासाठी या शिर्‍यात साखर कमी घातलेलीच उत्तम. तिरंगी शिरा आणि तिरंगी सरबत याद्वारे एका घासात आणि एका घोटात वेगवेगळ्या चवींची अनुभूती घेता येते.छायाचित्रं- गुगल

15 ऑगस्टला आपल्या सभोवतीचं वातावरण देशभक्तीनं भारलेलं असतं. मनातून आनंद ओसंडून वाहात असतो. हा आनंद मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांना भेटून , कुठेतरी छान भटकायला जाऊन साजरा केला जातो. पण मागच्या वर्षीपासून स्वातंत्र्यदिनाच्या या उत्साहावर कोरोनाची दाट सावली आहे. भलेही चारचौघात जाऊन नाही पण आपल्या कुटुंबियांबरोबर आपण स्वातंत्र्यदिनाचा आनंद घेऊनच शकतो.आनंदाचा विषय आला की खाण्याचा विचार महत्त्वाचा असतो. या दिवशी काहीतरी स्पेशल करायचं मनात असतंच. तुम्हालाही ‘काय करायचं बरं स्पेशल?’ असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर आहे आमच्याकडे.ते काय?तर रव्याचा तिरंगी शिरा आणि तिरंगी सरबत. या दोन्ही गोष्टी बनवणं सोपं आहे. शिवाय त्या बनवताना, त्याचा आनंद घेताना स्वातंत्र्यदिन आपण स्पेशल रितीनं साजरा केल्याचे समाधानही मिळेल.

छायाचित्र- गुगल

रव्याचा तिरंगी शिरा कसा करणार?

यासाठी पाऊण लिटर दूध, तीन मोठे चमचे साजूक तूप, 6 मोठे चमचे रवा ( बारीक किंवा जाड आपल्या आवडीप्रमाणे) , 3 मोठे चमचे साखर, 1 चमचा खस सिरप, 1 चमचा संत्र्याचा स्क्वॅश, 1 चमचा व्हॅनिला इसेन्स, 1 छोटी वाटी सुकामेवा एवढं जिन्नस घ्यावं.शिर्‍याला तिरंगी रंग येण्यासठी हा शिरा एकदम भाजून चालत नाही. टप्प्याटप्प्यनं एक एक रंगाचा शिरा तयार करावा लागतो. सर्वात आधी एका कढईत एक चमचा साजूक तूप घ्यावं. या तुपावर दोन मोठे चमचे रवा छान लालसर भाजावा. दुधाचे तीन समान भाग करुन घ्यावेत. रवा भाजला गेला की एक भाग दूध घालावं. मिश्रण थोडं दाटसर होइपर्यंत हलवत राहावं. नंतर त्यात एक चमचा साखर घालावी. साखर विरघळेपर्यंत शिरा हलवत राहावा. त्यानंतर त्यात संत्र्याचा स्क्वॅश घालावा. पुन्हा शिरा छान हलवून घ्यावा. ह शिरा एका भांड्यात काढून घ्यावा.

छायाचित्र- गुगल

आता पांढर्‍या रंगाचा शिरा करण्यासाठी कढईत आणखी एक चमचा तूप घ्यावं. त्यात दोन चमचे रवा घालून तो छान सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यावा. भाजलेल्या रव्यात एक भाग दूध घालावं.मिश्रण चांगलं हलवून घ्यावं. नंतर लगेच एक चमचा साखर आणि व्हॅनिला इसेन्स घालावा. शिरा घट्टसर होईपर्यंत परतत राहावा. नंतर हा शिराही एका भांड्यात काढून ठेवावा.हिरव्या रंगाचा शिरा तयार करण्यासाठी कढईत एक चमचा साजूक तूप गरम करुन घ्यावं. त्यात दोन चमचे रवा घालून रवा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यावा. रवा भाजला की त्यत दूध घालून मिश्रण दाट होईपर्यंत ते हलवत राहावं. नंतर त्यात एक चमचा साखर घालावी. साखर विरघळली की त्यात खस इसेन्स घालावा.शेवटी एक मोठं ताट घ्यावं. त्यावर प्लॅस्टिक शीट पसरावं. यावर आधी हिरव्या रंगाचा शिरा ठेवावा. त्यावर पांढर्‍या शिर्‍याचा थर लावावा आणि आणि सर्वात वर नारंगी रंगाचा शिर्‍याचा थर लावावा. हा स्पेशल शिरा आणखी स्पेशल करण्यासाठी त्यावर सुकामेवा बारीक तुकडे करुन पसरुन टाकावेत तसेच वेगवेगळ्या रंगाची टूटी फ्रुटीही घालावी. प्रत्येकाला तिन्ही रंगाच्या थराचा आस्वाद घ्यायला मिळेल अशा पध्दतीनं शिरा वाढावा. तीन रंग आणि तीन चवींचा हा शिरा खाताना त्याची एक वेगळीच न विसरता येणारी चव लागते. आपल्याला किती प्रमाणात शिरा करायला आहे त्याप्रमाणे वरील प्रमाणाचं सूत्र घेऊन रवा, साखर, तूप इसेन्स यांचं प्रमाण कमी जास्त करावं. या शिर्‍यात साखर शक्यतो कमी घालावी. कारण हिरव्या रंगाच्या शिर्‍यात घातला जाणारा खस इसेन्स हा खूप गोड असतो. आणि या तिरंगी शिर्‍याची आगळी वेगळी चव अनुभवता येण्यासाठी या शिर्‍यात साखर कमी घातलेलीच उत्तम.

तिरंगी सरबत

सध्या पाऊस जरा थांबलेला आहे. वातावरणात कोरडेपणा आहे. त्यामुळे थंड काहीतरी प्यावंसं वाटतं. त्यात रविवार आणि स्वातंत्र्य दिनाचा आनंद. हा आनंद साजरा करण्यासाठी खास तिरंगी सरबत केलं तर. हे सरबत करणं अगदी सोपं आहे.

छायाचित्र- गुगल

तिरंगी सरबत कसं करणार?

 या सरबतासाठी एक छोटा कप कीवी फळाचा गर, चार स्कूप व्हॅनिला आइस्क्रीम, 1 छोटा कप ऑरेंज पल्प, 4-5 बर्फाचे तुकडे आणि दोन छोटे चमचे लाइम सीजनिंग पावडर एवढं जिन्नस घ्यावं.सरबत करताना आधी दोन ग्लासमधे कीवी पल्प निम्मं निम्मं (समान) घालावं. यावर एक एक चमचा लेमन सिझनिंग पावडर घालून ते चांगलं मिसळून घ्यावं. नंतर दोन्ही ग्लासमधे दोन दोन स्कूप व्हॅनिला आइस्क्रीम घालावं. आणि सर्वात वर ऑरेंज पल्प घालावा. शेवटी बर्फाचे तुकडे घालून हे गारगार वेगळ्या चवीचं आणि तिन रंगाच्या मिश्रणाचं सरबत प्यावं.