Join us  

Oil Free Pakoda : तेलकट भजी-वडे नको? हे घ्या ऑइल फ्री भजी करण्याच्या ३ सोप्या पद्धती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 5:22 PM

How to make oil free pakoda? : तेल पिणारे भजी वडे नको वाटतात? 3 ट्रिक्स वापरुन करा ऑइल् फ्री भजी... भजी खाण्याचा हेल्दी प्रकार

पावसाळा असो किंवा चहासोबत काहीतरी खायचे असो. भजी नेहमीच आपली पहिली पसंती असतात. चहाबरोबर भजी छान लागतात आणि कांदाभजीची मजा काही वेगळीच. पावसाळ्यात घरात अळूवडी, भजी असे पदार्थ बनवले जातात. पण रोज तेलकट पदार्थ खाणं आरोग्याच्या दृष्टीनं योग्य नाही यामुळे  कॉलेस्टेरॉल, फॅट्स वाढून गंभीर आजार देखिल होऊ शकतात. ( Cooking Tips and Tricks) दुसरं म्हणजे तेलाचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशात भजी, वडे बनवायचं म्हटलं की जास्तच तेल लागतं. या लेखात तुम्हाला ऑईल फ्री भजी बनवण्याच्या काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत जेणेकरून तुम्ही कमीत कमी तेलात स्वादीष्ट भजी बनवू शकता. (How to make oil free pakoras bhajiya to save cooking oil)

नॉनस्टीक पॅनचा वापर

जेव्हा तुम्ही नॉन-स्टिक पॅनमध्ये काहीही शिजवता तेव्हा तुम्हाला जास्त तेलाची गरज नसते. जर तुम्हाला भजी ऑईल फ्री बनवायचे असतील तर त्यासाठी तुम्ही सामान्य कढईऐवजी नॉन स्टिक पॅन किंवा कढई वापरा. यासाठी, तुम्हाला भजी बनवायचे पीठ तयार करावे लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही ब्रेड पकोडे किंवा कांदा भजी बनवत असाल तर नेहमीप्रमाणे पीठ तयार करा. (How can I make my pakora less oily)

गॅसवर एक नॉन-स्टिक पॅन ठेवा आणि एक चमचा तेल घाला आणि संपूर्ण पॅनमध्ये समान रीतीने पसरवा. यासाठी तुम्ही ऑइल ब्रश देखील वापरू शकता. नॉन स्टिक तवा थोडा गरम झाल्यावर त्यात एक एक करून भजी टाकायला सुरुवात करा आणि ५ मिनिटं मंद शिजू द्या. 5 मिनिटांनंतर, एक भजी तपासा, जर त्याचा रंग सोनेरी तपकिरी होऊ लागला असेल तर दुसऱ्या बाजूला उलटे करा आणि शिजवा. दोन्ही बाजूनं भजी चांगली शिजल्यावर बाहेर काढा आणि चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

अप्प्यांच्या भांड्यात बनवा

ऑइल फ्री पकोडे बनवण्यासाठी तुम्ही अप्पे मेकर देखील वापरू शकता.  इतर भजींप्रमाणेच या भजी बनवा. उदाहरणार्थ, जर तुम्ही कांद्याचे पकोडे बनवत असाल तर त्यात बेसन, मीठ, चिरलेला कांदा, हिरवी धणे, चिरलेली हिरवी मिरची, चिमूटभर हळद, १/२ चमचा तेल, बेकिंग पावडर घालून घट्ट पीठ बनवा आणि चांगले फेटून घ्या. जेणेकरून पिठात गुठळ्या राहणार नाहीत.

कोथिंबीर पटकन निवडून होण्यासाठी खास २ टिप्स; कोथिंबीर जास्त दिवस राहील फ्रेश, हिरवीगार

अप्पे मेकरच्या सर्व साच्यांमध्ये थोडं तुप किंवा तेल घाला आणि प्रत्येक साच्यात थोडं थोडं पीठ घाला. मंद आचेवर भजी तळून घ्या. 10 मिनिटांनंतर, एक भजी उचला आणि एक बाजू हलकी तपकिरी झाली की तपासा आणि दुसरी बाजू देखील तपकिरी होईपर्यंत शिजू द्या नंतर बाहेर काढा आणि चाट मसाला शिंपडा. चटणी बरोबर सर्व्ह करा.

पाण्यात शिजवा

भजी तेलाऐवजी उकळत्या पाण्यात शिजवू शकता. कांद्याची भजी बनवत असाल तर प्रथम कांद्याचे पातळ काप करून त्यात भजीसाठीचे सर्व साहित्य टाका आणि तळण्यासाठी पीठ तयार करा. आता एका भांड्यात किंवा पातेल्यात पाणी उकळण्यासाठी ठेवा. पाण्याचे प्रमाण असे असावे की त्यात भजी सहज बुडतील.

पाणी उकळायला लागल्यावर चमच्याने किंवा हाताने एक एक करून भजी घाला. थोड्या वेळाने भजीचा रंग बदलू लागेल आणि ते शिजलेले दिसू लागतील. पाण्यातून एक भजी काढा आणि शिजली आहे का ते तपासा. नंतर  भजी पाण्यातून बाहेर काढा. तुम्ही वर चाट मसाला भुरभुरा आणि चटणी किंवा सॉस सोबत त्याचा आस्वाद घेऊ शकता.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्न