Join us  

चिमूटभर हिंगाशिवाय भारतीय स्वयंपाकात मजा नाही, मात्र अफगाणिस्तानशी असलेलं  ‘हिंगा’चं नातं माहीत आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2021 7:11 PM

भारतीय मसाल्यांच्या आकर्षणातूनच इंग्रज भारतात आले हे आपल्याला माहिती आहे. मसाले म्हटलं की ते भारतीयच. पण हिंग हा भारतीय मसाल्याचा महत्त्वाचा घटक असला तरी तो आपल्याकडे पिकत नाही. हिंग आपल्याला आयात करावा लागतो. हिंगाचं मूळ आहे सध्या तालिबानाच्या दहशतीनं दबलेल्या अफगाणिस्तानात.

ठळक मुद्देज्या भारतात हिंगावर सर्व प्रदेशातल्या स्वयंपाकात महत्त्वाचं स्थान आहे तो हिंग पिकवण्यासठी लागणारं हवामान उष्णकंटिबधीय हवामान असलेल्या भारतात नाही.भारतात हिंगाचे पांढरा आणि लाल असे दोन प्रकार वापरले जातात.भारतातील हिंगाची भूक भागवली जाते ती प्रामुख्याने अफगाणिस्तानातूनच. आपल्या एकूण गरजेपैकी 92 टक्के हिंग हा आपण अफगाणिस्तानातून आयात करतो.

चिमूटभर हिंगाचं महत्त्व काय? असा प्रश्न विचारला तर स्वयंपाकाला चव हे त्याचं उत्तर असेल. भारतीय स्वयंपाकात हिंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सामान्यजन हिंगाचा केवळ चव, विशिष्ट स्वाद याच दृष्टिकोनातून विचार करतात. तर आयुर्वेदात हिंगाला पचन व्यवस्थेशी जोडलं गेलेलं आहे. भाजी आमटीत घातलेला चिमूटभर हिंग हा आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचं काम करतो. म्हणूनच मसाल्याच्या डब्यात हिंगाला महत्त्वाचं स्थान असतं.

 छायाचित्र- गुगल

पण जो हिंग आपल्या भारतीय स्वयंपाकाच्या चवीचा आणि त्याच्या पोषणमूल्याचा अविभाज्य भाग झाला आहे तो हिंग आपल्याला बाहेरील देशातून आयात करावा लागतो. भारतीय मसाल्यांच्या आकर्षणातूनच इंग्रज भारतात आले हे आपल्याला माहिती आहे. मसाले म्हटलं की ते भारतीयच. पण हिंग हा भारतीय मसाल्याचा महत्त्वाचा घटक असला तरी तो आपल्याकडे पिकत नाही. . हिंग आपल्याला आयात करावा लागतो. हिंगाचं मूळ आहे सध्या तालिबानाच्या दहशतीनं दबलेल्या अफगाणिस्तानात. अफगाणिस्तानातून आयात होणारा हिंग आपल्या घरात पोहोचतो तो काही ग्रॅमच्या डब्बीत. आपण जो हिंग वापरतो तो ‘फेरुला अस्सा-फोटिडा’नावाच्या झाडापासून तयार होतो. तो आपण पावडर स्वरुपात वापरतो. हिंगाचा खडा आणि पावडर असे दोन्ही प्रकार आपल्याकडे मिळतात. हिंगाचं मूळ अफगाणिस्तानात असलं तरी आता अफगाणिस्तानच्या शेजारील तजाकिस्तान, उझबेकिस्तान या देशातही हिंग पिकवला जातो. न्यूज 18 डॉट कॉम वरील बातमीनुसार डॉलर बिझनेझ मॅग्झिनमधील एका अहवालानुसार जगातील एकूण हिंग उत्पादनाच्या 40 टक्के हिंग हा भारतात वापरला जातो. यावरुन आपल्या भारतात हिंगाला किती महत्त्व आहे याचा अंदाज सहज येईल.

 छायाचित्र- गुगल

भारतात हिंगावर सर्व प्रदेशातल्या स्वयंपाकात महत्त्वाचं स्थान आहे तो हिंग पिकवण्यासठी लागणारं हवामान उष्णकंटिबधीय हवामान असलेल्या भारतात नाही. हिंग हा कोरड्या मातीत, 35 अंश सेल्सिअस तापमानात फोफावतो. पण आपल्याकडील दमट आणि भरपूर पाऊस असलेलं हवामान हिंग उत्पादनास पोषक नाही. म्हणूनच भारतात प्रामुख्याने अफगाणिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान येथून हिंग आयात केला जातो.

हिंग आपल्या भारतात आला कसा? याचं उत्तर डॉ. मानोषी भट्टाचार्य इतिहास अभ्यासक देतात. त्या म्हणतात भारतात हिंग वापराचे दाखले इसपू 600 पासून मिळतात. हिंदू आणि बौध्द धर्माच्या ग्रंथात हिंगाचा उल्लेख आढळतो. अगदी महाभारताच्या ग्रंथातही हिंगाचा उल्लेख आढळतो. म्हणजे हिंग हा जरी आपण आयात करत असलो तरी हिंग वापरण्याची मुळं अगदी प्राचीन इतिहासातही आढळतात.भारतात हिंगाचे पांढरा आणि लाल असे दोन प्रकार वापरले जातात. पांढरा हिंग हा अफगाणिस्तानतला असून तो पाण्यात विरघळणारा आहे तर लाल हिंग हा इतर देशातला असून तो तेलात विरघळणारा आहे. इराण, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या तीन देशातूनही हिंग भारतात येतो. पण भारतातील हिंगाची भूक भागवली जाते ती प्रामुख्याने अफगाणिस्तानातूनच. आपल्या एकूण गरजेपैकी 92 टक्के हिंग हा आपण अफगाणिस्तानातून आयात करतो.

 छायाचित्र- गुगल

पण ऑक्टोबर 2020मधे भारताने पहिल्यांदा हिंगाची लागवड केली आहे. ‘हिमालयीन बायोरिसोर्स टेक्नॉलॉजीच्या सीएसआयआर प्रोजेक्ट अंतर्गत हिमाचल प्रदेशातील लाहौल दरी परिसरात हिंगाची लागवड करण्यात आली आहे. पण तज्ज्ञ सांगतात की या लागवडीतून प्रत्यक्ष हिंग मिळायला अजून पाच वर्ष तरी लागतील. सध्या तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानं आपल्याकडे सर्व सुकामेव्याचे भाव वाढले आहेत. तसेच हिंगाचेही. आधी 1400 रुपये किलो दराने मिळणारा हिंग सध्या कोलकत्ताच्या बाजारपेठेत 2000 किलो दराने मिळत आहे. अफगाणिस्तानातल्या अस्थिरतेमुळे हिंगाचे भाव आणखी वाढण्याचे चिन्हं आहेत. पण यानिमित्तानं आपल्या देशाचं अफगाणिस्तानाशी असलेलं हिंगाचं नातं लक्षात आलं.