Join us  

जगात भारी शाही पनीर, खवय्यांना पनीर पदार्थात शाही पनीरच का आवडले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2023 12:08 PM

Shahi Paneer Claims Third Spot In ‘World’s Best Cheese Dishes’ List : भारतीयांच्या आवडते शाही पनीर जगात तिसऱ्या क्रमांकावर...

पनीर हा एक अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. आहारात प्रथिनांचा समावेश व्हावा यासाठी पनीरचा वापर जेवणात केला जातो. शाकाहारी व्यक्तींसाठी प्रथिनांचा प्रमुख स्रोत म्हणून पनीर हा पदार्थ महत्त्वाचा मानला जातो. पनीर हा पदार्थ सगळ्यांच्या घरी आवर्जून खाल्ला जातो. दुधापासून तयार करण्यात येणार पनीर आपल्या आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक मानलं जात. पनीर पराठा, पनीर भुर्जी, पनीर पसंदा, शाही पनीर, पनीर मसाला असे पनीरचे असंख्य प्रकार बनवता येतात. हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण सहसा रोटीसोबत खाण्यासाठी मटार पनीर, शाही पनीर, पनीर भुर्जी असे अनेक भाज्यांचे प्रकार ऑर्डर करतो. पनीर हा लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत आवडणारा भाजीतील पदार्थ आहे. चावायला त्रासदायक नसणारा, अगदी मऊ असणारा पनीर वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये खूपच मस्त लागतो. अगदी स्टार्टरपासून ते भाजीपर्यंत अनेक पदार्थ पनीरपासून बनवता येतात. पनीरच्या वेगवेगळ्या प्रकारांतील भाज्यांपैकी शाही पनीर ही सगळ्यांच्याच तोंडाला पाणी आणणारी खास डिश आहे. आपल्या आवडत्या शाही पनीर डिशचा समावेश पनीर पासून तयार होणाऱ्या पदार्थांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर नोंदवला गेला आहे.   

जगभरातील खाद्य पदार्थांचा जेव्हा विषय निघतो, तेव्हा भारतीय पदार्थांचं नाव आवर्जून घेतलंच जातं. भारतीय आहार हा एक परिपूर्ण आहार आहे, असं आपण मानतो. कारण त्यामध्ये खारट, तिखट, तुरट, आंबट अशा सगळ्याच चवींचा आणि सगळ्याच पोषक पदार्थांचा उत्तम समन्वय साधलेला असतो. पण Taste Atlas यांच्यावतीने २०२३ या वर्षीसाठी नुकतीच जगभरातील विविध देशातील सर्वोत्कृष्ट पनीर पदार्थांची यादी जाहीर करण्यात आली. शाही पनीर हा भारतीय पदार्थ त्याच्या चव आणि सुगंधामुळे जगभरातील लोकांच्या हृदयावर राज्य करतात. आता, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणादरम्यान, जगातील सर्वोत्कृष्ट पनीर पदार्थांची यादी जाहीर करण्यात आली आहे, जिथे पुन्हा एकदा भारतीय पदार्थांनी बाजी मारली आहे(Indian Shahi Paneer claims third spot in ‘world’s best cheese dishes’ list; Paneer Tikka follows).

'शाही पनीर' जगात तिसऱ्या क्रमांकावर... 

 TasteAtlas ने नुकतेच त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर पनीर पासून तयार होणाऱ्या अनेक पदार्थांची यादी शेअर केली आहे. या यादीत सगळ्यांच्याच आवडत्या शाही पनीर ने तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. त्याचबरोबर पनीर टिक्का चौथ्या स्थानावर तर मटार पनीर २५ व्या स्थानांवर आहे. इतकेच नाही तर पालक पनीर ३० व्या क्रमांकावर तसेच साग पनीर ३१ व्या क्रमांकावर आहे. कढई पनीर आणि पनीर मखनी हे अनुक्रमे ४० व ४८ व्या क्रमांकावर आहेत. TasteAtlas च्या यादीमध्ये जगभरातील एकूण ५० पनीर पाककृतींचा समावेश आहे, त्यापैकी ७ भारतातील आहेत. सर्वेक्षणानंतर या पदार्थांना 'जगातील सर्वोत्कृष्ट पनीर डिशेस' या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. 

जगभरातल्या सर्वोत्तम सँडविचच्या यादीत ‘वडापाव’ने मारली बाजी; खमंग झणझणीत वडापावच्या चवीची कमाल...

पनीर पासून तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांची ही यादी समोर येताच नेटकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. ही यादी पाहून नेटकरी आपल्या पनीर बद्दलच्या वेगवेगळ्या कमेंट्स सोशल मीडियावर शेअर करत आहेत. एका यूजरने लिहिले की, "शाही पनीर म्हणजे स्वर्गसुख: आहे." दुसर्‍याने लिहिले, "मटार पनीर हा माझ्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम आवडीच्या पदार्थांपैकी एक आहे."

टॅग्स :अन्नसोशल व्हायरल