सतत पोळी-भाजी, भात-आमटी खाऊन आपल्यालाही कंटाळा येतो तर लहान मुलांना तर येतोच येतो. अशावेळी काहीतरी वेगळं हवं म्हणून मुलांचा आणि घरातल्या सगळ्यांचाच हट्ट असतो. यातही मुलांना चटपटीत पदार्थ हवे असतात. मात्र आई म्हणून आपल्याला त्यांना चटपटीत पदार्थांबरोबरच हेल्दी द्यायचे असते. आता या दोन्हीचा मध्य काढायचा तर काहीतरी शक्कल लढवायला हवीच ना. यासाठीच प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी एक खास रेसिपी सांगितली आहे. कुणाल कपूर सोशल मीडियावर बरेच अॅक्टीव्ह असून ते नेहमी काही ना काही नवीन शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी कप पिझ्झाची एकदम हटके आणि झटपट होणारी एक छानशी रेसिपी शेअर केली आहे. ही रेसिपी काय आहे, पाहूया (Instant Cup Pizza Recipe by Chef Kunal Kapur)...
साहित्य -
1. ब्रेड - ५ ते ६ स्लाईस
2. बटर - २ चमचे
3. लसूण - १ चमचा बारीक केलेला
4. वेगवेगळ्या रंगाच्या शिमला मिरची - ३ ते ४
5. कांदा - १
6. मिक्स्ड हर्ब - १ चमचा
7. टोमॅटो केचअप - २ चमचे
8. मोझोरोला चीज - ३ ते ४ चमचे
कृती -
१. ब्रेड स्लाईस मिक्सरमध्ये बारीक करुन घ्यायचे.
२. पॅनमध्ये बटर घालून त्यावर लसूण घालून तो थोडा परतून मग हा ब्रेडचा चुरा चांगला लालसर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा.
३. सगळ्या वेगवेगळ्या रंगाच्या शिमला मिरची आणि कांदा बारीक कापून घ्या.
४. त्यामध्ये मिक्स हर्बस आणि टोमॅटो केचअप घालून ते सगळे एकजूव करुन घ्या.
५. एका ग्लासमध्ये खाली भाजलेला ब्रेडचा चुरा घाला, त्यावर हे भाजीचे टॉपिंग घालून त्यावर भरपूर मोझोरोला चीज घाला. असे लेअर २ वेळा लावा
६. हा कप ओव्हनमध्ये काही मिनीटांसाठी गरम करायला ठेवा.
७. कप बाहेर काढून चमच्याने कप पिझ्झा खाण्याचा आनंद घ्या.