Join us  

डाळ-तांदूळ न भिजवता नाश्त्याला करा गरमागरम कुरकुरीत डोसा; १५ मिनीटांत होणारी चविष्ट रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2023 12:35 PM

Instant Dosa and Chutney Recipe : घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून आपण डोसा आणि चटणीचा झक्कास बेत कसा करु शकतो, पाहूया...

डोसा करायला सोपा असल्याने आणि घरातील मंडळींना आवडत असल्याने अनेकांच्या आवडीचा पदार्थ. यासोबत कधी सांबार, कधी बटाट्याची भाजी नाहीतर चटणी केली की काम होतं. कधी या पीठातच सगळ्या भाज्या घातल्या की हेल्दी असा उतप्पा होतो. सतत पोळी-भाजी खाऊन कंटाळा आला की विकेंडला किंवा अगदी एरवीही रात्रीच्या जेवणाला नाहीतर नाश्त्याला हा झटपट होणारा आणि पोटभरीचा प्रकार आवर्जून केला जातो. पण डोसा म्हटला की डाळ-तांदूळ भिजवणं आलं, मग ते वाटणं आलं आणि मग ते आंबेपर्यंत थांबणं आलं. पण अचानक डोसा खायची इच्छा झाली तर? अशावेळी बाजारातून पीठ विकत आणण्यापेक्षा घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून आपण डोसा आणि चटणीचा झक्कास बेत करु शकतो. हा बेत करण्यासाठी नेमकं काय करायचं पाहूया (Instant Dosa and Chutney Recipe)..

डोसा करण्यासाठी 

१. एका बाऊलमध्ये साधारण २ वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं.

२. यामध्ये बारीक चिरलेला कांदा, गाजर, कोथिंबीर आणि आपल्याला आवडतील त्या भाज्या घालायच्या.

३. पीठाच्या २.५ पट पाणी गरम करुन घ्यायचे आणि यातील अर्धे पाणी पीठात घालून पीठ एकजीव करुन घ्यायचे. 

४. यामध्ये आवडीनुसार जीरं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिली फ्लेक्स आणि मीठ घालावं.

५. अंदाज घेऊन पुन्हा गरम पाणी घालून पीठ चांगलं पातळसर करुन ५ मिनीटं पीठ मुरण्यासाठी ठेवावं.

६. त्यानंतर तवा चांगला गरम झाल्यावर त्यावर तेल लावून मग हे पीठ घालून डोसे दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावेत. 

चटणी कशी करायची?

१. अर्धी वाटी खोबऱ्याचे काप, पाव वाटी शेंगादाणे आणि १ चमचा तीळ मिक्सरच्या भांड्यात घालावे.

 

२. यामध्ये १ इंच आलं, २ ते ३ मिरच्या, ४ ते ५ लसूण पाकळ्या घालाव्यात.

३. यात १ चमचा साखर, अर्ध्या लिंबाचा रस आणि थोडे पाणी घालून हे मिश्रण मिक्सरवर फिरवून घ्यावे.

४. त्यानंतर झाकण उघडून यात पुन्हा पाणी आणि मीठ घालून पुन्हा एकदा चांगले बारीक करुन घ्यावे.

५. कढईमध्ये २ चमचे तेल घेऊन त्यात मोहरी, उडदाची डाळ आणि हिंग घालावे.

६. मग त्यामध्ये कडीपत्ता आणि २ लाल मिरच्या घालून हे सगळे चांगले परतून घ्यावे.

७. ही फोडणी चटणीवर घातली की चटणीला मस्त खमंगपणा येतो. आवडीप्रमाणे यामध्ये जीरेही घालू शकतो.

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.