सकाळी नाश्त्याला डोसे आणि चटणी किंवा डोसे आणि सांबार असला की दिवसभर भूक लागण्याची चिंताच नसते. विकतच्या आयत्या पिठापेक्षा घरी इडली डोशाचं पिठ करुन त्याचे डोसे खायला अनेकांना आवडतं. पण ही आवड प्रत्यक्षात उतरवण्यासाठी वेळेचं गणित मात्र जमायला हवं. ते जमलं नाही तर मग इच्छा असूनही डोसे करता खाता येत नाही. डोसा करण्याच्या पारंपरिक पध्दतीत वेळेचा मुद्दा आहेच, पण झटपट डोसे करण्याच्याही पध्दती आहेत. पण झटपट प्रकारातले डोसे करताना चव, डोशावरची जाळी हे मुद्दे मनासारखे होत नाही आणि डोसे खाण्याचं समाधान मिळत नाही. चविष्ट आणि जाळीदार डोसे हवेत तर मग नेहमीची पध्दतच हवी असं वाटू लागतं. पण झटपट डोसा पध्दतीत जाळीदार आणि चविष्ट डोसेही सहज शक्य आहे. त्यासाठी खूप सामग्रीची गरज नसते आणि खूप खटपट करण्याचीही गरज नसते. पोहे आणि दही या दोन गोष्टींनी झटपट जाळीदार चविष्ट डोशाचा उद्देश सहज साध्य होऊ शकतो.
Image: Google
दही आणि पोहे घालून झटपट डोसा तयार होतो. या दोन सामग्रीचा उपयोग करुन डोसे करताना दिवसभर डाळ तांदूळ भिजवण्याची आणि मिश्रण वाटून ते रात्रभर आंबवण्याची गरज नसते. आज डोसे खायचे असा विचार सकाळी डोकावला तरी रात्रीच्या जेवणात किंवा रात्री विचार आला तर सकाळच्या नाश्त्याला घरीच तयार केलेल्या पिठाचे डोसे खाणं सहज शक्य आहे.
झटपट डोसे तयार करण्यासाठी 1 कप तांदूळ, अर्धा कप पोहे, अर्धा कप दही, 2 मोठे चमचे उडदाची डाळ, 1 छोटा चमचा मेथ्या, अर्धा चमचा साखर, गरजेनुसार तेल आणि पाणी आणि चवीनुसार मीठ घ्यावं.
Image: Google
डोसे बनवण्यासाठी आधी तांदूळ, उडदाची डाळ आणि मेथ्या स्वच्छ धुवून एका भांड्यात पाणी घालून 4-5 तास भिजवावे. पोहे धूवुन तेही त्याच भांड्यात तांदळासोबत भिजायला घालावेत. 4-5 तासानंतर पाणी काढून टाकून भिजलेले तांदूळ मिक्सरमधून वाटावेत. तांदूळ वाटतानाच त्यात दही घालावं, वाटलेलं मिश्रण भांड्यात काढावं. ते घट्ट वाटल्यास त्यात थोडं पाणी घालावं. मिश्रणात थोडी साखर आणि मीठ घालावं. मिश्रण ढवळून ते पंधरा ते वीस मिनिटं झाकूण ठेवावं.
Image: Google
20 मिनिटानंतर डोसे करण्यासाठी तवा गरम करावा. गरम झालेल्या तव्याला थोडं तेल लावून नेहमीप्रमाणे डोश्याचं पीठ घालून डोसे करवेत. डोसे सोनेरी रंगावर आले की नारळाच्या ओल्या चटणीसोबत किंवा गरमागरम सांबारासोबत खावेत. पोहे आणि दही वापरुन झटपट डोसेही नेहमीच्या पिठाच्या डोशाप्रमाणे जाळीदार आणि कुरकुरीत होतात. चविष्ट लागतात, मज्जा आणतात!