मेदूवडा हा आपल्यापैकी अनेकांचा आवडीचा पदार्थ. गरमागरम मेदूवडा आणि चटणी किंवा सांबार असेल तर आपल्याला जेवणही नसले तरी चालते. कुरकुरीत असल्याने लहान मुलंही अतिशय आवडीने हे वडे खातात. मेदू वडा म्हणजे उडदाची डाळ भिजवणं आलं. पण ही डाळ भिजवलेली आणि वाटलेली नसेल आणि आपल्याला झटपट ऐनवेळी मेदूवडे खाण्याची इच्छा झाली तर? अशावेळी रवा, दही आणि इतर जिन्नस वापरुन आपण इन्स्टंट मेदू वडे करु शकतो. अगदी १५ ते २० मिनीटांत होणारे आणि मेदू वड्यांसारखेच लागणारे हे वडे करण्याची सोपी रेसिपी पाहूया. हे वडे तितकेच कुरकुरीत आणि चविष्ट लागत असल्याने सगळेच आवडीने खातात. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून तयार होत असल्याने त्यासाठी खूप वेगळं काही सामान आणावं लागतं असंही नाही. पाहूयात हे वडे करण्याची सोपी पद्धत (Instant Easy Medu Wada Recipe)...
साहित्य -
१. रवा - २ वाट्या
२. दही - १ वाटी
३. जीरे - अर्धा चमचा
४. मिरपूड - १ चमचा
५. आलं पेस्ट - १ चमचा
६. मिरच्या - २ बारीक चिरलेल्या
७. हिंग - पाव चमचा
८. मीठ चवीपुरते
९. कडीपत्ता - ७ ते ८ पाने
१०. कोथिंबीर - १ चमचा बारीक चिरलेली
११. बेकींग सोडा - अर्धा चमचा
१२. तेल - साधारण २ वाट्या
कृती -
१. एका मोठ्या आकाराच्या बाऊलमध्ये बेकींग सोडा आणि तेल सोडून इतर सर्व घटक एकत्र करुन घ्या.
२. अंदाजे थोडे थोडे पाणी घालून घट्टसर बॅटर बनवा आणि चांगले एकजीव करा.
३. साधारण १५ ते २० मिनीटे हे पीठ झाकून ठेवा म्हणजे ते मुरण्यास मदत होईल.
४. झाकण काढून बेकींग सोडा आणि अगदी अर्धा चमचा पाणी घालून पीठ पुन्हा एकजीव करुन घ्या.
५. कढईत तेल तापायला ठेवून एकसारख्या आकाराचे वडे करुन त्यात सोडा.
६. सोनेरी रंगाचे होईपर्यंत वडे मध्यम आचेवर दोन्ही बाजुने तळून घ्या म्हणजे कुरकुरीत होण्यास मदत होईल.
७. सांबार आणि चटणीसोबत हे वडे अतिशय चविष्ट लागतात.