रोज रोज पोळी-भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो. इतकंच नाही तर जेवताना आपल्याला सोबत चटणी किंवा लोणचं काही ना काही तोंडी लावायला हवंच असतं. मग कधी दाण्याची चटणी तर कधी लिंबाचं नाहीतर कैरीचं लोणचं आपण आवर्जून घेतो. जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि नावडती भाजी घशाखाली उतरवण्यासाठी आपल्याला कशाचा ना कशाचा आधार घ्यावाच लागतो. लसूण हा आपल्या आहारातील एक अतिशय उपयुक्त घटक. लसणामुळे आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी दूर होतात. त्यामुळे आपण फोडणीत घालण्यासाठी किंवा चटणीमध्ये आवर्जून लसणाचा वापर करतो. पण याच लसणाचे चटपटीत लोणचे केले तर (Instant Garlic Pickle Recipe by Chef Kunal Kapur) ?
आता लोणचे म्हटल्यावर त्यासाठी बरेच पदार्थ लागतील आणि खूप वेळ लागेल असं आपल्याला साहजिकच वाटेल. पण हे लसणाचे लोणचे अगदी झटपट १० मिनीटांत होणारे असून पाहुणे येणार असतील किंवा घरात तोंडी लावायला काहीच नसेल अशावेळी अगदी जेवायला बसताना तुम्ही करु शकता. प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही रेसिपी सांगितली आहे. कुणाल कपूर कायम आपल्या चाहत्यांना काही ना काही नवीन किंवा पारंपरिक रेसिपी सांगत असतात. त्यामुळे आपल्या जेवणाची रंगत तर वाढतेच पण आपण काही ना काही नवीन ट्रायही करतो. पाहूयात असेच हे झटपट होणारे लसणाचे लोणचे...
साहित्य -
१. तेल - अर्धी वाटी
२. मेथ्या १ चमचा
३. मोहरी - १ चमचा
४. बडिशोप - १ चमचा
५. कलौंजी - १ चमचा
६. कडीपत्ता - ८ ते १० पाने
७. लाल मिरच्या - ५ ते ६
८. लसूण पाकळ्या - २० ते २५
९. हळद - १ चमचा
१०. लाल तिखट - अर्धा चमचा
११. व्हिनेगर - पाव वाटी
१२. मीठ - चवीपुरते
कृती -
१. पॅनमध्ये तेल चांगले गरम करुन घ्यावे.
२. यामध्ये मेथ्याचे दाणे टाकून ते थोडे लालसर होऊ द्यावेत.
३. त्यामध्ये मोहरी आणि कलौंजी घालून फोडणी तडतडू द्यावी.
४. यामध्ये लाल मिरच्या आणि कडीपत्ता घालावा, यामुळे लोणच्याला एकप्रकारचा चांगला स्वाद येतो.
५. मग यामध्ये लसूण पाकळ्या घालून हे सगळे एकजीव करुन घ्यावे.
६. नंतर यामध्ये हळद, तिखट आणि मीठ घालावे.
७. व्हिनेगर घालून साधारण २ मिनीटे सगळे शिजू द्यावे.
८. गार झाल्यावर हे लोणचे एका बाऊलमध्ये काढून ठेवावे.