Join us  

मुगाची भजी करायची पण डाळ भिजत घालायलाच विसरलात? १ सोपा उपाय, १० मिनीटांत करा कुरकुरीत भजी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2023 4:22 PM

Instant Moong Dal Bhaji Pakora Recipe : डाळ भिजवली नसेल तरी झटपट करता येतात कुरकुरीत मूगडाळ भजी...

बाहेर धुवाधार पाऊस पडत असताना गरमागरम भजी खाण्यातलं सुख काही वेगळंच. एका हातात गरम भजीची प्लेट आणि दुसऱ्या हातात वाफाळता चहा म्हणजे एकदम आयडीयल कॉम्बिनेशन. भजी म्हटल्यावर आपल्याला सगळ्यात आधी आठवतात ती कांदा भजी, बटाटा भजी फारतर पालक भजी आणि मूग भजी. पचायला हलकी असल्याने लहान मुलांना किंवा घरातील ज्येष्ठ मंडळींना खायला आपण मूगाची भजी करतो. मुगाची भजी करायची म्हणजे मूग किंवा मूगाची डाळ भिजत टाकायला हवी (Instant Moong Dal Bhaji Pakoda Recipe). 

मात्र काही वेळा गडबडीत आपण ही डाळ भिजत घालायला विसरतो. पण आपल्याला ही भजी खाण्याची खूप जास्त इच्छा झालेली असते. अशावेळी इच्छा मारण्यापेक्षा काही सोपी ट्रिक वापरुन ही भजी करता आली तर? आज आपण अशीच एक सोपी ट्रिक पाहणार आहोत. ज्यामध्ये डाळ भिजवली नसेल तरी गरमागरम भजी खाण्याचा आनंद लुटता येईल. प्रसिद्ध शेफ पंकज भदौरीया यासाठी काही महत्त्वाच्या ट्रिक्स शेअर करतात.  

१. एरवी आपण मुगाची डाळ  भिजवायला विसरलो असू तर डाळ मिक्सरमधून ओबडधोबड बारीक करुन घ्यायची. 

(Image : Google)

२. ही डाळ कोमट पाण्यात १० मिनीटांसाठी भिजवायची. जेणेकरुन ती अतिशय छान फुलते आणि सगळे पाणी डाळीत शोषले जाते. 

३. डाळ भिजत असताना कांदा, मिरची, आलं आणि कोथिंबीर बारीक चिरुन घ्यायची. आलंस मिरची मिक्सरमध्ये बारीक करायचे असले तरी हरकत नाही. 

४. डाळ भिजल्यानंतर ती चांगली घट्टसर होते. मग भजी हलकी होण्यासाठी हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये घालून अंदाजे पाणी घालून बारीक करुन घ्यायचे.  

५. त्यानंतर हे मिश्रण बाऊलमध्ये घेऊन त्यात अगदी चिमूटभर बेकींग सोडा घालायचा. हा सोडा घातल्यानंतर मिश्रण ३ ते ४ मिनीटे चांगले फेटायचे. एका बाऊलमध्ये पाणी घालून त्यात या पीठाचा एक थेंब घालून पाहायचा तो वर तरंगला तर मिश्रण चांगले एकजीव झाले असे समजावे.

६. त्यानंतर यात कांदा, मिरची, आलं, कोथिंबीर आणि मीठ घालून ते पुन्हा चांगले एकजीव करायचे. थोडे वेळ असेल तर १० ते १५ मिनीटांसाठी हे पीठ फ्रिजमध्ये ठेवायचे म्हणजे भजी कुरकुरीत होतात. 

७. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचे आणि मध्यम तापले की यातील २ चमचे तेल भजीच्या पीठात मिक्स करायचे आणि हलवून घ्यायचे. 

८. मग या पीठाची एकसारखी गोलाकार भजी घालून ती खरपूस गोल्डन रंगावर ही भजी तळून घ्यायची आणि सॉस किंवा चटणीसोबत खायची.  

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.मानसून स्पेशल