डोसा म्हटलं लहान मुलं फार खूश होतात. साऊथ इंडियन पदार्थ अनेकांच्या आवडीचे असतात आणि ते करायलाही सोपे असतात. पण त्यासाठी डाळ-तांदूळ भिजत घालावी लागते. आदल्या दिवशी रात्री उडदाची आणि मूगाची डाळ आणि तांदूळ भिजत घालणे, दुसऱ्या दिवशी हे मिश्रण मिक्सरवर बारीक करुन वाटून ठेवणे आणि मग ते चांगले आंबले की त्याचे इडली किंवा डोसा करणे. ही मोठी प्रक्रिया असल्याने आपण हे पीठ नेहमी करतोच असे नाही. पण काही वेळा मुलं अचानक डोसा खाण्याची मागणी करतात. अशावेळी डाळ, तांदूळाऐवजी घरात उपलब्ध असणाऱ्या डाळींपासून पौष्टीक डोसा केला तर..भरपूर डाळी असल्याने प्रोटीनयुक्त हा डोसा आरोग्यासाठी तर पौष्टीक असतोच पण झटपट होत असल्याने मुलांना मधल्या वेळेला देण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. झटपट होणारी आणि चविष्ट अशी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करु शकता (Instant Multigrain Dosa Recipe)...
साहित्य -
१. उडीद डाळ - अर्धी वाटी
२. हिरवे मूग - पाव वाटी
३. मसूर डाळ - पाव वाटी
४. तूर डाळ - पाव वाटी
५. हरभरा डाळ - पाव वाटी
६. तांदूळ - पाव वाटी
७. साबुदाणा - पाव वाटी
८. मूग डाळ - पाव वाटी
९. मेथ्या - १ चमचा
१०. तेल - अर्धी वाटी
कृती -
१. वर दिलेल्या सगळ्या डाळी आणि घटक पाण्यात भिजत घालायचे.
२. साधारण ३ ते ४ तास भिजल्यानंतर ते मिक्सरमधून बारीक करायचे.
३. मिक्सरमध्ये बारीक करताना त्यामध्ये हिरवी मिरची, आलं आणि जीरं घालायचं.
४. हे पीठ एका भांड्यात काढून घेऊन त्यामध्ये मीठ आणि अंदाजे पाणी घालून पीठ सारखं करायचं.
५. तवा चांगला तापवून घ्यायचा आणि त्यावर तेल घालून याचे छान पातळ डोसे घालायचे. दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्यायचे.
६. हे डोसे चटणी, सांबार, दही कशासोबतही अतिशय चविष्ट लागतात.