सारखी पोळी भाजी, भात आमटी आणि कोशिंबीर खाऊन आपल्याला कंटाळा येतो. यात बदल म्हणजे कधीतरी भाकरी नाहीतर पुऱ्या. फारफार रात्रीच्या जेवणासाठी मूगाची खिचडी नाहीतर भाज्यांचा पुलाव. पण दिवसभराच्या कामाने आपण थकलेलो असलो आणि खूप भूक लागली असेल तर रात्रीच्या वेळी झटपट होणारे आणि गरमागरम असे काहीतरी हवे असते. इतकेच नाही तर सकाळीही उठल्यावर कामे उरकण्याच्या नादात आपल्याला खूप भूक लागून जाते आणि मग सतत पोहे, उपीट खायचा कंटाळा येतो. साऊथ इंडियन पदार्थ आपल्यातील अनेकांच्या आवडीचे असतात. पण दरवेळी डाळ-तांदूळ भिजवणे, ते वाटणे याच्या वेळेचे गणित जमेलच असे नाही. अशावेळी घरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून झटपट डोसे करता आले तर? पाहूयात तांदळाच्या पीठापासून होणारे कुरकुरीत आणि चविष्ट डोसे. पाहूयात कसे करता येतील हे पौष्टीक डोसे...
साहित्य -
१. तांदळाचे पीठ - एक वाटी २. रवा - अर्धी वाटी ३. दही - अर्धी वाटी ४. मीठ - चवीनुसार ५. साखर - एक चमचा ६. गाजर - अर्धी वाटी (किसलेले) ७. कांदा - अर्धी वाटी (बारीक चिरलेला) ८. कोथिंबिर - आवडीनुसार ९. तेल - अर्धी वाटी१०. जीरे - अर्धा चमचा
कृती -
१. तांदळाचे पीठ, रवा आणि दही एकत्र करुन चांगले एकजीव करुन घ्यायचे.
२. त्यामध्ये अंदाजे पाणी घालून डोसा होईल इतके पातळ बॅटर तयार करायचे.
३. यामध्ये किसलेले गाजर, चिरलेला कांदा, साखर, मीठ, जीरे, कोथिंबीर घालावी.
४. आवडत असल्यात तुम्ही यामध्ये बीट, एखादी पालेभाजी, मिरच्यांचे तुकडे हेही घालू शकता.
५. हे बॅटर १० मिनीटे झाकून ठेवावे. १० मिनीटांमध्ये तुम्ही डोसासोबत खाण्याची चटणी किंवा दुसरे एखादे काम करु शकता.
६. गॅसवर तवा तापायला ठेवून त्यावर ब्रशने तेल लावून डोसे घालावेत. दोन्ही बाजूने खरपूर भाजून घ्यावेत.
७. अतिशय छान जाळीदार डोसे होतात, यासोबत तुम्हाला आवडेल ती ओली चटणी, कोरडी चटणी तुम्ही घेऊ शकता. एखादवेळी लोणचे, स़ॉसही चांगला लागतो.
८. या माध्यमातून मुले ज्या भाज्या खात नाहीत त्या भाज्या मुलांच्या पोटात जातील यासाठी प्रयत्न करु शकता.
९. तसेच गरमागरम असल्याने हे डोसे थंडीच्या दिवसांत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात.
१०. यावर तुमच्या आवडीप्रमाणे तूप, बटर, किसलेले चीजही तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे त्याची मजा आणखी वाढते.