उन्हाळ्यात गारेगार आइस्क्रीम, कुल्फी खाण्याची इच्छा सतत होते. थंड मिठाया खायला मजा येते. थंड मिठाया म्हटलं की रबडी, बासुंदी, फ्रूट सॅलेड, श्रीखंड-आम्रखंड अशा पदार्थांची यादी डोळ्यासमोर येते या थंड मिठायांच्या यादीत आणखी एका पदार्थाचा समावेश करायला हवा. रबडी केक. थंड मलईदार केक खाण्यासाठी रबडी केक करावा. एरवीच्या केकच्या तुलनेत झटपट होणाऱ्या रबडी केकची रेसिपीही सोपी आहे.
Image: Google
रबडी केक कसा करावा?
रबडी केक करण्यासाठी मैदा, तेल, दही, पिठीसाखर, दूध, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि वॅनिला इसेन्स आणि रबडीसाठी दूध, साखर, वेलची पूड, केसर आणि सुका मेवा घ्यावा.
रबडी केक करताना सर्वात आधी एका भांड्यात दही, तेल, वॅनिला इसेन्स एकत्र करुन 3-4 मिनिटं फेटून घ्यावं. मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि पिठी साखर एकत्र चाळून घ्यावी. हे सर्व दह्याच्या मिश्रणात घालून जिन्न्स एकजीव करावं. केकच्या भांड्याला साजूक तूप लावून ते ग्रीस करुन घ्यावं. या भांड्यात फेटलेलं मैद्याचं मिश्रण घालावं. एका मोठ्या भांड्यात पाणी घालावं. ते आधी उकळून घ्यावं. पाणी उकळलं की भांड्यात केकचं भांडं झाकून ठेवावं. भांड्यावर झाकण ठेवून मंद आचेवर 40 मिनिटं केक शिजू द्यावा. 40 मिनिटांनी भांड्यावरचं झाकण काढून केक झालाय का हे तपासावं. केक झाला असल्यास गॅस बंद करावा. हा केक मायक्रोवेवमध्ये केला तरी चालतो.
Image: Google
रबडी करण्यासाठी एका मोठ्या भांड्यात एक लिटर दूध घालावं. ते आटवून निम्मं करावं. दूध निम्म झालं की यात केशर काड्या, वेलचे पूड आणि साखर घालावी. गॅस बंद करुन रबडी गार होवू द्यावी. रबडी सामान्य तापमानाला आली की केकला टूथपिकनं छिद्रं पाडावीत. मग रबडी केकवर सर्व बाजूंनी पसरुन घालावी. छिद्रातून रबडी केकमध्ये जिरते. केक वरुन सुकामेवा घालून सजवावा. हा केक फ्रिजमध्ये ठेवून गार करावा. उन्हाळ्याच्या दिवसात थंडगार मलईदार केक खाण्याची हौस भागवण्यासाठी रबडी केक अवश्य करुन पाहावा. मदतीला ही रेसिपी आहेच!