नाश्त्याला रोज वेगळं काय करायचं असा प्रश्न महिलांसमोर असतो. मग पोहे, उपमा, खिचडी, शिरा असे पदार्थ केले जातात. तर कधी आदल्या दिवशीच्या पोळ्यांची फोडणीची पोळी किंवा फोडणीचा भात केला जातो. पण नाश्त्याला वेगळं काहीतरी असेल तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खूश होतात. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पोह्यांपासून झटपट आणि कुरकुरीत डोसे कसे करायचे पाहूया. नेहमीचे डोसे करायला डाळ-तांदूळ भिजवायचे, ते वाटायचे मग आंबवण्यासाठी ठेवायचे अशी थोडी मोठी प्रोसेस असते. पण हे डोसे अगदी ऐनवेळी ठरवलं तरी झटपट होण्यासारखे असतात. हिरवी चटणी, सॉस, लोणचं अशा कशासोबतही आपण हे डोसे खाऊ शकतो. विशेष म्हणजे हे डोसे इतके छान होतात की ते पोह्याचे आहेत हे खाणाऱ्यांना समजतही नाही. पाहूयात हे झटपट डोसे कसे करायचे (Instant Rice Flex Poha Dosa Easy Breakfast Recipe).
साहित्य -
१. जाड पोहे - २ वाटी
२. मीठ - चवीनुसार
३. दही - अर्धी वाटी
४. सोडा - पाव चमचा
५. तिखट - आवडीनुसार
६. कांदा - १
७. कोबी, गाजर, बीट, शिमला मिरची - आवडीनुसार
८. कोथिंबीर - अर्धी वाटी
९. तेल
कृती -
१. पोहे मिक्सरमध्ये बारीक करुन घ्यायचे.
२. त्यामध्ये दही, मीठ आणि सोडा घालायचा.
३. पाणी घालून हे मिश्रण एकजीव करुन घ्यायचे.
४. पॅनला तेल लावून त्यावर हे बॅटर घालायचे.
५. आवडीनुसार यावर बारीक चिरलेला कांदा, तिखट घरात उपलब्ध असतील त्या भाज्या किसून घालायच्या.
६. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि डोसा दोन्ही बाजुने खरपूस भाजून घ्यायचा.
७. गरमागरम डोसा चटणी, दही किंवा लोणच्यासोब त खायचा.